Raj Thackrey : ईडीला घाबरून मोदींना पाठिंबा दिला ? राज ठाकरेंनी सांगितली ‘ती’ कहाणी
राज ठाकरे यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी कोहिनूर मिल प्रकरणाशी संबंधित ईडी नोटीसीचा उल्लेख करून, त्यामुळे आपण कुणालाही पाठिंबा दिला नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यांनी कोहिनूर मिलमधील आपल्या सहभाग आणि त्यानंतरच्या कायदेशीर प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी अजित पवारांच्या महायुतीत प्रवेशावरही टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीच्या (2024) वेळेस महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. लोकसभी निवडणुका न लढवण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर केला होता. मात्र वेळोवेळी मोदींवर, तसेच भाजपावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला. नंतर विरोधात बोलले. नंतर परत सपोर्ट केला. का तर त्यांच्या मागे ईडी लावली असा प्रचार करण्यात येत होता. मात्र ते खरं होतं का, ईडीच्या टांगत्या तलवारीमळेच राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला का या अशा अनेक प्रश्नांची खुद्द राज ठाकरे यांनीच स्पष्ट उत्तर दिली.
लोकसभेत मोदींना आपण का पाठिंबा दिला याविषयी राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली. लोकसभेत मोदी शिवतीर्थावर आले होते. त्यावेळी त्यांच्यासमोर मी म्हटलं मला ज्या ज्यावेळी बोलायचं ते बोललो. मी असं काही म्हटलं का की मी बोललो नाही. मी म्हणालोच नाही. माझं बोलून झालं. माझं सुटलं ते सुटलं. जे बोललो त्याला आधार होता. जे चांगलं कराल त्याला चांगलं म्हणू, जे वाईट त्याला वाईट म्हणू, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
वरळी येथील सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी कोहिनूर मिलची संपूर्ण कहाणीच सांगितली. समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांचा पुतळा आहे. त्यांच्यासमोर जे सांगेल ते शपथपूर्वक सांगेन, असेही त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाले राज ठाकरे ?
२००५ची वगैरे गोष्ट हे, शिवाजी पार्कात लहानपणापासून कोहिनूर मिल पाहत होतो. एके दिवशी बातमी वाचली. तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता. बातमी होती, एनटीएससीच्या मिल्स काढा. जे काही कामगारांची देणी असेल ती देऊन टाका. मी ही बातमी वाचत होतो, त्यात कोहिनूर मिलचाही उल्लेख होता. मी लगेच माझ्या पार्टनरला फोन केला. ते म्हणाले. प्रकरण मोठं आहे. मी म्हटलं आपण चेक करू. मी दुसऱ्या सहकाऱ्याला फोन केला. त्यांना म्हटलं बसू बघा काय होतं. आम्ही आकडेवारी केली, टेंडर भरलं. एकेदिवशी पार्टनरचा सकाळी घाबरत फोन आला. म्हटलं काय झालं. म्हणाला, टेंडर लागलं. ते ४०० ते ५०० कोटीचं टेंडर होतं. म्हटलं, आणायचे कुठून. माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण तसं दाखवलं नाही,असे राज ठाकरे म्हणाले.
आमच्या दुसऱ्या मित्राला सांगितलं. एक आयएल अँड एफएस नावाची कंपनी होती. ती कंपनी म्हणाली की, आम्ही पैसे भरायला तयार आहोत. सर्व पैसे त्या कंपनीने भरले,आम्ही सात आठ जण पार्टनर होतो. सर्व सुरू झालं, पण त्यात ब्रेक आला. केस कोर्टात गेली. दीड वर्ष गेलं, त्यानंतर पुन्हा काम सुरू झालं. मी सहकाऱ्याला म्हटलं हा पांढरा हत्ती आहे,झेपणार नाही आपण बाहेर पडूया. माझ्या तर सहकाऱ्यांनीही दुजोरा जिला, म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन त्यातून बाहेर पडलो. ही २००८ची गोष्ट आहे. त्यानंतर आमचा विषय संपला.
ईडीची नोटीस का आली ?
ज्या दिवशी मला ईडीची नोटीस आली, तेव्हा मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस, का आली ? त्यात कोहिनूरचा विषय होता. आमचा काय संबंध होता ?. ते लोक काय बोलत होते ते कळत नव्हते. जे पैसे आले. त्यावर टॅक्स भरला आणि गेला. त्या कंपनीनेही टॅक्स भरला. आम्ही त्यातून बाहेर पडलो. ती गोष्ट आली तेव्हा सीएला बोलावलं. त्याला विचारलं काय झालं. तो म्हणाला, तुमच्या एका पार्टनरने तुमचे टॅक्स भरलाच नाही. त्याने बाहेरच्या बाहेर ते पैसे वापरले होते, असं लक्षात आलं.
मी विचारलं सीएला की आता काय करायचं ? तर तो म्हणाला की आता परत टॅक्स भरायचा. आम्ही परत सगळ्यांनी आपापला टॅक्स भरला,उगाच त्या झंझटीत कोण जाईल ? तिथेच तो विषय संपला,असा किस्सा त्यांनी सांगितला. पण आता एवढ्या गोष्टीसाठी राज ठाकरे मोदींना घाबरला आणि स्तुती करायला लागला? मला काय घेणं देणं त्याच्याशी. माझ्या डोक्यावर तलवार घेऊन नाही मी फिरत असं म्हणत राज ठाकरेंनी ईडीचा संपूर्ण किस्सा सांगत, त्या भीतीपोटी आपण कुणालाही पाठिंबा दिलं नसल्याचं स्पष्ट केलं.
हे बाकीच्यांसारखं नाही, सहा दिवस आधी मोदी म्हणतात 70 हजार कोटींचा घोटाळा केला आत टाकू. आम्हाला माहीत नव्हतं ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आत टाकूचा अर्थ हा होतो हे पहिल्यांदा कळलं,असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना महायुतीत घेण्याच्या मुद्यावरूनही टीकास्त्र सोडलं.