प्रगतीने मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर… – राज ठाकरेंची रोखठोक मुलाखत
राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली आहे. केवळ भाषा दिन साजरे करणे किंवा अभिजात दर्जा मिळवणे पुरेसे नाही. प्रगतीच्या नावाखाली मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात येत असेल तर ती प्रगती अनावश्यक आहे. त्यांनी शाळांत शिवरायांचा इतिहास शिकवण्याचीही मागणी केली आणि सध्याच्या शैक्षणिक पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महाराष्ट्रात होणाऱ्या प्रगतीने मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ती प्रगती नको, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलला राज ठाकरे यांनी मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली. शाळेमध्ये मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी ,मराठी भाषेला मिळालेला अभिजातचा दर्जा मिळाला त्यानंतर देखील काही अनेक प्रश्न उपस्थित केले. आपल्याकडेच्या नेते मंडळी यांनी मराठी भाषेकडे कसे पाहिलं पाहिजे यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं.
काय म्हणाले राज ठाकरे ?
आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठी या विषयाकडे पाहण खूप आवश्यक आहे. नुसता भाषा दिवस साजरा करणं आणि अभिजाता भाषेचा दर्जा मिळणं याने फक्त मराठी टिकणार नाहीये. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून जर प्रगति होणार असेल ना तर ती प्रगति आम्हाला नको, अशी रोखठोक भूमिका राज ठाकरेंनी मांडली. आज जे फ्लायओव्हर्स, जे ब्रीज वगैरे होत आहेत, ते दिसायला छान दिसतंय, पण यातून जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ते आम्हाला नकोय, असेही ते म्हणाले.
शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला पाहिजे
आपल्याकडे शाळेत शिवाजी महाराज शिकवले जात नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. या मुळात ज्या शाळा आल्या त्या आयएएस अधिकारी आणि त्यांच्या मुलांसाठी सुरू झाल्या, देशभरात त्या शाळा आहेत. पण त्या शाळेत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवता येत नाही ? ज्यांना आपण क्रांतीचा उगम म्हणतो, त्यांचा इतिहासच तुम्हाला सांगता येत नाही का ? फ्रेंच रिव्होल्यूशन शिकवता तुम्ही, आम्हाला काय चाटायचं ते ? अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्वेग व्यक्त केला. या इतिहासातून आपण बोध काय घेतोय, ते शिकवणं जास्त गरजेचं आहे अशी भूमिका राज ठाकरेंनी स्पष्टपणे मांडली.
महेश मांजरेकर आणि राज ठाकरेचा दिलखुलास संवाद, हा शनिवारी महेश मांजरेकरांच्या यूट्यूब चॅनल प्रसारित होणार आहे.