बहुचर्चीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल लागल्यापासून भाजप नेते राजन तेली नाराज असल्याचा चर्चांना उधाण आले होते, आज सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर राजन तेली यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी भाजपच्या कोणत्याही नेत्यावर नाराज नव्हतो आणि कधी असणारही नाही.हा राष्ट्रीय पक्ष आहे. मी जिल्हा बँक निवडणूकी पूर्वी एक महीना अगोदर मला जबाबदारीतून मुक्त करा असं सांगितलं होतं. त्यावेळी नाराजीचा कोणताचं मुद्दा नव्हता, त्यामुळे याचे वेगवेगळे अर्थ काढू नका. माझे सर्व नेते चांगलं मार्गदर्शन करत आहेत, सर्वच सहकार्य करतात. जिल्हा बँकेचा निर्णय रात्री राणे साहेब देतील आणि त्या निर्णयाचं पालन उद्या जिल्हा बँकेच्या निवडणूकीत होईल. अशी सावध प्रतिक्रिया राजन तेली यांनी दिली आहे.
बैठकीत राणे काय म्हणाले?
तसेच या पुढच्या सर्व निवडणूका भारतीय जनता पक्ष कसा जिंकेल या साठी मार्गदर्शन केलं, अशी माहितीही तेली यांनी दिली आहे. उद्या जिल्हाबँकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आपले बसतील. तसेच राणे साहेबांकडे असणाऱ्या खात्याच्या माध्यमातून आणि जिल्हाबँकेच्या संयुक्त विद्यमाने जास्तीत जास्त उद्योजक आणि रोजगार तयार व्हावेत यासाठी मार्गदर्शन केलं. जिल्हाबँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीचा निर्णय राणे साहेब घेतील, असेही तेलींनी सांगितले.
नितेश राणेंबाबतच्या सुनावणीकडे लक्ष
नितेश राणे यांच्याबाबत सरकार तर्फे युक्तिवाद करताना पुढचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही अॅक्शन घेणार नाही असं कोर्टाला सांगितल आहे, त्यामुळे उद्याच्या सुनावणीवर आमचं लक्ष आहे. कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. असेही तेली म्हणाले. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.