‘जान है तो जहान है’, राजेश टोपेंनी चंद्रकांतदादांना मोदींच्या वक्तव्याची करुन दिली आठवण! कारण काय?
राज्यातल्या निर्बंधावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती, त्याला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर देताना मोदींच्या वाक्याची आठवण करून दिली आहे.
राज्यातल्या निर्बंधावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती, त्याला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर देताना मोदींच्या वाक्याची आठवण करून दिली आहे. सततच्या लॉकडाऊनच्या जाचाला कंटाळून पुण्यातल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी कळली. शिथिल न झालेले निर्बंध आणि नोकरी गमावून बसल्यामुळे तरुणांना आपलं आयुष्य संपवावं लागत आहे. मात्र सरकारने निर्बंधांचा कळस गाठला असून नागरिकांचा गळा घोटणं सुरूच ठेवलं आहे. मी अनेकदा हे सांगितलं होतं की, निर्बंध शिथिल करा, लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करा आणि जनजीवन सुरूच ठेवा. मात्र सरकारने जनतेचा काहीही विचार केला नाही आणि अशा कित्येक तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या सर्व आत्महत्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार आहे. अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती.
पाटील मोदींचे वाक्य आठवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करताना नेहमी जान है तो जहान है, असे बोलतात, त्यामुळे जीव आहे, सर्व आहे, चंद्रकांत पाटलांनी हे लक्षात घ्यावे असे टोपे म्हणाले आहेत. राज्यातली रुग्णसंख्या कमी झाली की निर्बंध शिथील करता येतील. सध्या रुग्णसंख्येतील वाढ मोठी आहे त्यामुळे निर्बंध घालणे गरजेचे आहे, असेही टोपे म्हणाले आहे. आज आपण संपूर्ण बंद नाही केलं, काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन बंद केल्याचे टोपे यांनी सांगितलं.
रुग्णांची विचारपूस कॉलद्वारे करण्यात येणार आहे. रुग्णाला अडचण आल्यास ल्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात यावं यासाठी ही प्रकिया सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, तसेच डॅशबोर्ड तयार करून रुग्णांना सर्व माहिती व्यवस्थित मिळावी याची खबरदारी घेतली जाणार, यात रुग्णांना बेड आणि औषधांबाबत माहिती मिळणार आहे. अशी माहितीही टोपेंनी दिलीय.