मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
जालना: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचं राजेशे टोपे यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या नातेवाईकांना 10 लाखांचं अर्थसहाय्य केलं होतं.
गुणवत्तेच्या आधारावर नोकरी
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिलं होतं. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणं गरजेचं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी, असं राजेश टोपे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 34 युवकांच्या कुटुंबीयांना मदत
महाविकास आघाडी सरकारनं नोव्हेंबर महिन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादी ट्विटरवरुन शेअर केली होती. सतत पाठपुरावा केल्यानं मराठा समाजातील 34 युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याचं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं.
सतत पाठपुरावा केल्याने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला.बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने आज 10 लक्ष रुपये मदत वितरित केली आहे. pic.twitter.com/shelDMkDHs
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 29, 2021
शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार मानले होते.
इतर बातम्या:
मास्कचा वापर कमी झाल्याने देशावर कोरोना संकट, केंद्रीय टास्क फोर्सचा इशारा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात राजेंद्र शिंगणे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
Rajesh Tope said Maharashtra Government will job to martyr of Maratha Reservation protest he talk to cm Uddhav Thackeray