पत्रीपुलाला हेरिटेजचा दर्जा द्या, मनसे आमदार राजू पाटलांची उपरोधिक मागणी
पत्रीपुलाच्या बांधकामाचं काम प्रचंड संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली (Raju Patil on patri pool work).
ठाणे : “पत्रीपूल आणि माणकोली-मोठागाव या दोन्ही पुलांचे काम सुरु आहे. या पुलांना हेरिटेजचा दर्जा द्या”, अशी उपरोधिक मागणी मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे (Raju Patil on patri pool work). राजू पाटील यांनी आज (11 ऑगस्ट) कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत तक्रार करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. शहरात सात दिवसात खड्डे भरले पाहिजेत, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिली.
कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाचं गेल्या दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून काम सुरु आहे. मात्र, अजूनही पत्रीपुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या पत्रीपुलाच्या बांधकामावरुन राजू पाटील यांनी सत्ताधारींवर नाव न घेता टीका केली (Raju Patil on patri pool work).
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज माणकोली पुलाची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी नाव न घेता श्रीकांत शिंदेंवर टीका केली. “या पुलांची फक्त बिले काढण्यासाठी पाहणी दौरा केला जात आहे. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करु नका”, असा टोला राजू पाटील यांनी लगावला.
‘राजकारण्यांची कोरोनाला घालवण्याची इच्छा नाही’
दरम्यान, राजू पाटील यांनी आज डोंबिवलीतील जीमखाना येथे उभारण्यात येत असलेल्या कोव्हिड सेंटरची पाहणी केली. यावेळीदेखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “केडीएमसीत नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आता कमी होऊ लागला आहे. मात्र, तरीही कोव्हिड सेंटर उभारण्याचे काम सुरुच आहे”, असं राजू पाटील म्हणाले.
“कोव्हिड सेंटरमध्ये इंजेक्शन ठेवायला फ्रीज नाही. खाटा टाकण्याचे काम सुरु आहे. एका रुग्णामागे 20 जणांना जबरदस्तीने क्वारंटाईन करुन खाटा भरण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्र्याच्या भाषेत कोरोनाची जाण्याची इच्छा आहे, पण इथल्या राजकारण्यांची कोरोनाला घालविण्याची इच्छा नाही”, अशी टीका राजू पाटील यांनी स्थानिक प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर केली.