Sanjay Raut | राज्यसभेसाठी शिवसेनेचे दोन ‘संजय’, अर्ज भरला, महाविकास आघाडी 6 पैकी 4 जागा मिळवणारच, राऊतांचा दावा!
राज्यसभेच्या सहा जागांपैकी शिवसेनेनं दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यात संजय राऊत यांच्यासह कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा समावेश आहे.
मुंबईः राज्यसभेच्या सहा जागांपैकी शिवसेना (Shiv Sena) दोन जागा लढवणार असून यासाठी आज शिवसेनेच्या वतीने संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी अर्ज भरला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे सर्व खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडी चार जागांवर विजय मिळवून दाखवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच केंद्रीय तपास यंत्रणानी आमच्या नेत्यावर कितीही कारवाया करो, जनता सगळं पहात आहे. आगामी निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
शिवसेनेकडून दोन ‘संजय’
राज्यसभेच्या सहा जागांपैकी शिवसेनेनं दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यात संजय राऊत यांच्यासह कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असता तर संजय पवार यांच्याऐवजी संभाजीराजेंना उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र संभाजीराजेंनी नुकतीच स्वराज्य पक्षाची स्थापना केली असून शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला होता. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने संजय पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येत्या 31 मे रोजी प्रफुल्ल पटेल हे उमेदवारी अर्ज भरतील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. तसेच काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा अद्याप होणे बाकी आहे. महाविकास आघाडी एक असून आम्ही सगळे एकत्रपणे विरोधकांशी लढणार आहोत, असं वक्तव्य यावेळी संजय राऊतांनी केलं.
‘नेत्यांवरील कारवाया राजकीय सूडबुद्धीतून’
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिव परब यांच्या निवासस्थानावर आज पहाटेच ईडीच्या पथकाने धाड टाकली असून परबांशी संबंधित सात ठिकाणांवर अधिकाऱ्यांची ही कारवाई सुरु आहे. दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यानी केला होता. त्यानंतर ईडीची ही कारवाई होत आहे. मात्र भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. ईडी, सीबीआयचा दबाव टाकून जागा जिंकता येणार असतील तर त्यांनी खुशाल असे प्रयत्न करावेत. पण ही लोकशाही आहे. शिवसेना अशा दबावाला भिक घालत नाही. महाराष्ट्र झुकत नाही आणि शिवसेना झुकणारही नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.