Rajyasabha Election : मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, संजय पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजी छत्रपती अजूनही आशावादी
संभाजीराजे अजूनही शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत आशावादी असल्याचे दिसून येत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. तसेच संभाजीराजे हे मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून (Rajyasabha Election) सध्या राजकारण शिगेला पोहोचले आहे. सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली गेली. मात्र तरीही राजे अपक्ष लढण्याच्या भूमिकवर ठाम राहिले. तर आमचा पाठिंबा शिवसेनेच्याच उमेदवाराला अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली. त्यानंतर आज शिवसेनेकडून संजय पवारांच्या (Sanjay Pawar) नावची घोषणा या जागेसाठी करण्यात आलीय. मात्र संभाजीराजे अजूनही शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत आशावादी असल्याचे दिसून येत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे. तसेच संभाजीराजे हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वर्षा निवासस्थानी दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
सेनेच्या अधिकृत भूमिकेत काय?
काही मराठा संघटना संभाजीराजे यांची मुंबईत भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच शिवसेनेची अधिकृतपणे भूमिका जाहीर होत नाही तोवर आपण काही बोलणार नाही. मात्र सेनेने अधिकृतपण भूमिका जाहीर केल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करेल असेही राजे म्हणाले आहेत. त्यामुळे सेनेची अधिकृत भूमिका कधी जाहीर होईल, याकडे राजकीय नजरा लागल्या आहेत.
राऊत म्हणतात विषय आमच्यासाठी संपला
संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे आणि उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय.पण याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.दोन्ही सेनेचे उमेदवार विजयी होतील.पवार कडवट शिवसैनिक आहेत, पक्के मावळे आहेत आणि मावळे असतात म्हणून राजे असतात. शिवसेनेच्या दृष्टीने सहाव्या जागेचा चाप्टर क्लोज झालाय, अशी माहिती काही वेळापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
मराठा संघटना आक्रमक मोडवर
संजय राऊतांच्या या प्रतिक्रियेनंतर मराठा संघटना आता चांगल्याच आक्रमक मोडवर आल्या आहेत. संजय राऊत तुमचा सत्तेचा माज आम्ही शिवभक्त उतरवल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारा अंकुश कदम समन्वयक- मराठा क्रांती मोर्चा यांनी दिला आहे. तर शिवसेनेच्या दाबाव तंत्राला आम्ही घाबरत नाही. संभाजी महाराजांच्या राज्यसभेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण होत आली आहे. त्यांना विजयासाठी लागणाऱ्या 42 मतांची जलावजुळव झाली आहे. आता 5 ते 6 मतांची कमी असल्याने त्याची जुळवाजुळव चालू आहे. तसेच मराठा समाज, बहुजनांचे मतदान हवे असेल तर आज छत्रपतीना बिनविरोध राज्यसभेत पाठवा नाहीतर पक्षाचा प्रोटोकॉल पाळायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधींना मराठा समाज त्यांची जागा दाखवेल, असे करण गायकर म्हणाले आहेत.