संविधान बदलणार म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडेल; रामदास आठवले यांचा भरसभेतून दम
काँग्रेसच्या काळात विचार करून निर्णय होत नव्हते. आम्ही गरीब आहोत, मात्र ज्यांच्याशी नातं जोडतो त्यांना आम्ही कधी धोका देत नाही. माझ्यावर आरोप केले जातात, जिकडे सत्ता तिकडे मी जातो. मात्र तसे होत नाही मी जिकडे जातो तिकडेच सत्ता येते. महायुतीतील मित्रपक्ष ईमानदारीने काम करत आहेत, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते संविधानच बदलणार असल्याचं विरोधक सांगत आहेत. खुद्द भाजपच्या नेत्यांच्या विधानाचा हवाला देऊनच विरोधक हा आरोप करत आहेत. तर मोदी किंवा भाजप कधीही संविधान बदलणार नसल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले वारंवार सांगत आहेत. आज तर आठवले यांनी कोल्हापूरच्या जाहीरसभेतून अपप्रचार करणाऱ्यांना दमच भरला आहे. कितीही अफवा पसरवल्या तरी माझा समाज नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे. जे कुणी बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदललं जाणार आहे, असं म्हणतात त्यांचे थोबाड फोडेन, असा इशाराच रामदास आठवले यांनी दिला आहे.
महायुतीची आज कोल्हापुरात मोठी सभा झाली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी रामदास आठवले यांनीही भाषण करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. संविधान कोणीही बदलू शकत नाही. नरेंद्र मोदींनी देखील अशी घोषणा केली आहे. संविधान हे पवित्र असल्यामुळे त्याला कोणी हात लावू शकत नाही. विरोधकांकडे दुसरा विषय नसल्यामुळे बहुजन समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडीकडून केल जात आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे असा प्रचार ते करत आहेत. मात्र या अशा गोष्टींवर लोकांनी विश्वास ठेवू नये. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून संविधान राखण्याचं उद्दिष्ट मोदी यांचं आहे, असं रामदास आठवले म्हणाले.
शाहू महाराजांनी उभं राह्यला नको होतं
महाविकास आघाडीने कोल्हापुरात शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने शाहू महाराजांना तिकीट द्यायला नको होते. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. शाहू महाराज यांनी निवडणुकीला उभा राहायला नको होतं. नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी संभाजीराजे यांचा सन्मान केला, असं सांगतानाच नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि मला मंत्री करण्यासाठी पुन्हा महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहनही त्यांनी केलं.
आठवले यांची चारोळी
या महापूरूषांच्या तुम्हाला आण,
निवडून द्या धनुष्यबाण,
या राज्यातून फेकून द्या मविआची घाण,
देशाचे पंतप्रधान आहेत स्ट्राँगमॅन,
म्हणून राहूल गांधींना करा बॅन…
मान देऊया गादीला…
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार भाषण केलं. मान देऊया गादीला आणि मत देऊया मोदीला, असं आवाहन करतानाच ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नाही किंवा धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी नाही, तर ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. त्यामुळे तुम्ही माने आणि मोहितेंना मतदान केलं तर ते थेट मोदींनाच जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदींमुळेच जिवंत
ज्यांनी कोल्हापूरचा टोल घालवला त्यांचे उमेदवार संजय मंडलिक आहेत. तर ज्यांनी टोल आणला त्यांचे उमेदवार कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे. 2019 नंतर या देशात घुसण्याची कुणाची हिंमत झाली नाही, कुणाची वाकडी नजर पडली नाही. सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवत असताना मोदींनी अनेक निर्णय घेतले. कोरोनात मोदी नावाच्या वाघाने स्वतः लस तयार करून घेतली. 140 कोटी लोकांपर्यंत दोन वेळा लस मिळाली. आपण जिवंत राहिलो ते या लसीमुळे आणि मोदींमुळे. त्यासाठी आपण मोदींचे प्रतिनिधी म्हणून संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना निवडून द्या, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं.