‘देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते’, रामदास कदम यांचा दावा
"भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी 20 ते 25 वेळा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी चर्चेचे दरवाजे स्वतःहून बंद केले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी चर्चेची दरवाजे बंद केले. याचा मी साक्षीदार आहे", असं रामदास कदम म्हणाले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. तर रामदास कदम यांनी काश्मीरच्या निकालावरुन भाजपचं कौतुक केलं आहे. “महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जे घडलं ते विधानसभा निवडणुकीत घडणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे. मी राजकारणात 55 वर्षांपासून आहे. मी राजकारणातले 55 पावसाळे पाहिले आहेत. भाजपने जिथे आपल्या देशाचा झेंडा लावला जात नव्हता तिथे जम्मूमध्ये क्रांती घडवली. पंडितांचे खून पडले होते, पंडितांना काश्मीरमधून हाकलून लावलं. त्यांचं पुनर्वसन आता पुन्हा होईल”, असा दावा रामदास कदम यांनी केला.
“2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी 20 ते 25 वेळा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी चर्चेचे दरवाजे स्वतःहून बंद केले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी चर्चेची दरवाजे बंद केले. याचा मी साक्षीदार आहे. मातोश्रीचे दरवाजे उद्धव ठाकरे यांनी बंद केले, भाजपने नाही. देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते”, असा दावा रामदास कदम यांनी केला. “मी महाराष्ट्राला सांगेन उद्धव ठाकरे यांचं बेगडी राजकारण चाललं आहे. त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराला पायदळी तुडवले”, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
‘जम्मू-काश्मीर खुलं करण्याचं काम कुणाच्या बापाला जमलं नव्हतं’
“जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवणे हे जम्मू-काश्मीर खुलं करण्याचं काम कुणाच्या बापाला जमलं नव्हतं. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मुस्लिम समाजाच्या विरोधी ही भूमिका नव्हती. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी मुस्लिम समाजाच्या डोक्यात जे भरवलं आहे ते हळूहळू त्यांच्या डोक्यातून बाहेर पडेल. स्वातंत्र्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसने फक्त मुस्लिम समाजाला वापरून घेतलं आहे. आजही मुस्लिम समाजामध्ये जी गरिबी आहे याचं कारण फक्त काँग्रेस आहे”, अशी टीका रामदास कदम यांनी केली.