‘पूजाला हाताशी धरुन मला ब्लॅकमेलिंग’, सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांचा मोठा गौप्यस्फोट
"विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून त्यांनी फॅमिलीचा मुद्दा समोर आणला. कारण विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही म्हणून घरगुती प्रकरण समोर आणायचं आणि लोकसभेत अडथळा आणायचा हे विरोधकांचं षडयंत्र आहे", अशी प्रतिक्रिया रामदास तडस यांनी पूजा तडस यांच्या आरोपांवर दिली आहे.
वर्ध्याचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर त्यांच्या सून पूजा तडस यांनी गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पूजा तडस यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पूजा तडस यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास तडस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. आपल्या मुलाचं आणि सूनेचं प्रकरण कोर्टात सुरु आहे. कोर्टात सुनावणी सुरु आहे. सूनेच्या आरोपांवर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या कुटुंबाचा मुद्दा समोर आणला. विरोधकांचं हे षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया रामदास तडस यांनी दिली.
रामदास तडस यांच्या दाव्यानुसार नेमकं प्रकरण काय?
“2020 मध्ये पूजा आणि पंकजचं लग्न झालं. ते लग्न त्यांनी परस्पर केलं. त्यावेळेस पूजाचे कुटुंबिय होते. आमच्या कुटुंबाला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी वर्ध्याला एक फ्लॅट घेतला. दोघीही चांगले राहायला लागले. एकमेकांना चांगलं समजून घ्यायला लागले. पण त्यानंतर काही समाजकंटकांनी पूजाला हाताशी धरुन ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला. तुझ्या सासऱ्याकडे पैशांची मागणी कर, असं ब्लॅकमेलिंग केलं. त्यावेळेस त्यांच्या बोलण्याची एक कॅसेट होती. ती कॅसेट पंकजच्या हाती लागली. त्यानंतर त्यांच्यात आपापसात वाद झाला. त्यानंतर पंकज देवीला राहायला आला. तिथे त्याने देवीला एक घर घेतलं. तिथे त्याचं दुकान आहे. त्या दुकानाच्या वर तो राहतो. मी त्याला त्यावेळेसच बेदखल करुन टाकलं. त्यांची कोर्टात केस सुरु आहे”, अशी माहिती रामदास तडस यांनी दिली.
‘पूजाला फॉर्म भरायला लावला, ब्लॅकमेलिंग केलं’
“ज्या लोकांनी त्यावेळेस ब्लॅकमेलिंग केली अशी 10 लोकं होती. त्यापैकी एकजण हत्येच्या गुन्हा प्रकरणात जेलमध्ये होतं. तो आता जामिनावर बाहेर आहे. त्या लोकांनी एक षडयंत्र केलं. याला मारुन टाकायचा. त्याच्या प्रॉपर्टीवर ताबा घ्यायचा असा पूजाला सल्ला दिला. 2020 चं प्रकरण आता पुन्हा बाहेर काढलं. पूजाला फॉर्म भरायला लावला. ब्लॅकमेलिंग केलं. माझ्याकडेसुद्धा पैशांची मागणी केली. माझी काय चूक आहे?”, असा सवाल रामदास तडस यांनी केला.
‘मी त्यांना आजही घरी ठेवायला तयार’
“त्यांनी लग्न केलं. त्यांनी सुखरूप राहावं. जर ते दोघं चांगले राहत असतील तर मी त्यांना आजही घरी ठेवायला तयार आहे. पण त्यांचं आपापसातच जमत नसेल, तुम्ही मुलाला मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची कॅसेट सापडली. प्रकरण कोर्टात आहे. विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणून त्यांनी फॅमिलीचा मुद्दा समोर आणला. कारण विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही म्हणून घरगुती प्रकरण समोर आणायचं आणि लोकसभेत अडथळा आणायचा हे विरोधकांचं षडयंत्र आहे”, असा आरोप रामदास तडस यांनी केला.
“हे होणार होतं ते मला माहिती आहे. कारण मी त्यांची मागणी मान्य केली नव्हती. माझ्याकडे पैसे नाहीत. मी पैसे देणार नाही. माझा या प्रकरणात दोष नाही. तुम्ही मझा दोष दाखवून द्या. माझा एक जरी दोष असला तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. माझा दोष नसताना मला ब्लॅकमेल करता, हे बरोबर आहे का? हे प्रकरण 2020 आधीही आलं होतं”, असा दावा रामदास तडस यांनी केला.
रामदास तडस यांच्या सूनेचे नेमके आरोप काय?
- मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझं लग्न लावण्यात आलं
- उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला
- बाळाची डीएनए टेस्ट कर असं सांगत माझ्यावर आरोप केले जात आहेत
- ज्या फ्लॅटवर राहत होते, तो फ्लॅट विकून मला बेघर केलं
- रामदास तडस यांनी मुलाला घरात ठेवून मला एकटीला बाहेर काढलं
- बाळाचा बाप कोण असं म्हणत माझी अवहेलना केली जात आहे
- डीएनएसाठी तयार, कोर्टाद्वारे सर्व गोष्टींना सामोरं जायला तयार
- मला सांध दोन वेळेचं अन्नही दिलं जात नाही