रावसाहेब दानवे यांनी एकनाथ शिंदे यांचेच टोचले कान, महायुतीत काय चाललंय?
"आम्ही सुद्धा जनता पार्टीतून बाहेर पडलो होतो तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीची स्थापना करताना जनता पार्टीच्या कार्यालयावर अधिकार दाखवणार नाहीत. त्यांच्या चिन्हावर अधिकार दाखवणार नाहीत, असं आम्ही ठरवलं होतं", असं रावसाहेब दानवे म्हणाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव यावर भाष्य केलं. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं आहे. यावरुन प्रचंड राजकीय वाद झाला. ठाकरे गटाकडून आमचा पक्ष आणि नाव चोरीला गेले, अशी टीका केली जाते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या या वादावर रावसाहेब दानवे यांनी भूमिका मांडत एकनाथ शिंदे यांचेच कान टोचले आहेत. “उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा आपापसातला भांडण आहे. आम्ही त्यात पडत नाहीत. आम्ही सुद्धा जनता पार्टीतून बाहेर पडलो होतो तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीची स्थापना करताना जनता पार्टीच्या कार्यालयावर अधिकार दाखवणार नाहीत. त्यांच्या चिन्हावर अधिकार दाखवणार नाहीत, असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे धनुष्यबाणावरून सुरू असलेला वाद ही त्यांची आपापसातली भांडण आहेत”, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांनाच टोला लगावला. यावेळी दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.
“ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत दानवे यांचा कार्यकर्ता महिलेबद्दल वादग्रस्त बोलला. त्याची क्लिप सर्वत्र व्हायरल झाली आहे. आम्ही त्यांच्या गाडीवर दगडफेक केली नाही. हा त्यांनी निवडणुकीत केलेला स्टंट आहे. निवडणुकीत ज्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकते उमेदवार गाडीवर एक-दोन दगड मारून घेतात. हे सगळं सोंग चालू आहे”, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.
दानवेंची ठाकरेंवर टीका
“उद्धव ठाकरे आम्हाला दरोडेखोर म्हणतात. मग अडीच वर्ष त्यांनी दरोडे टाकले नाहीत का? एवढ्या वर्षापासून ते सोन्यासारखी मुंबई लुटत आहेत. आम्ही मुंबईचा विकास केला. याला दरोडे टाकणं म्हणतात का? तर कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे घरात बसून होते. आम्ही लोकांना रुग्णालयात घेऊन जात होतो. कोरोना काळात विकास करता आला नाही, असे ते म्हणतात. मग भ्रष्टाचार कसा करता आला याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावं”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
‘वेगळं वागायला लागलो तर मतदार नाराज होतील’
“मी 45 वर्षापासून एकाच पक्षात काम करतो. त्यामुळे माझा एक चाहता वर्ग आहे. माझ्यावर कोणी आरोप केले, प्रत्यारोप केले. हे वैयक्तिक स्वरूपाचं आहे. आतापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला मत द्या, असं मी म्हणालो. आता जर मी वेगळं वागायला लागलो तर मतदार नाराज होतील म्हणून मी अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. त्यांचा प्रचार करतोय. जर मला पक्षाने सिल्लोडचा दौरा करायला सांगितला तर मला जावं लागेल. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या पेक्षा माझी इमेज मला सांभाळायची आहे. ती खराब होऊ द्यायची नाही त्यामुळे मी त्यांचा प्रचार करणार आहे. अब्दुल सत्तार जर माझ्याकडे आले तर मी त्यांचा आदर, सत्कार करेन आणि पक्षाने जर मला त्यांचा प्रचार करायला सांगितलं तर मला जावं लागेल. मी पक्षाशी बांधील आहे. सत्तारांसाठी माझे दार कधीही उघडे आहेत”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.