Raosaheb Danve: राज ठाकरेंनी मला पेढे दिले, मी त्यांना रेल्वेचं इंजिन गिफ्ट दिलं; रावसाहेब दानवेंना नेमकं सांगायचंय काय?
Raosaheb Danve: भाजप नेते नितीन गडकरी यांच्या पाठोपाठ रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट घेतली.
मुंबई: भाजप नेते नितीन गडकरी यांच्या पाठोपाठ रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या रॅलीतून हिंदुत्वाचा नारा दिल्यानंतर दोन केंद्रीय मंत्र्यांनी राज ठाकरे यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीच्या राजकीय चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंच्या घरी गेल्यावर त्यांनी मला पेढा दिला. मी त्यांना रेल्वेचं इंजिन भेट दिलं. त्यांनी त्यांची परप्रांतियांची भूमिका सोडली तर काहीही होऊ शकते. मायावती यांनी अखिलेश यादवांशी युती केली, शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी (congress) युती केली. नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांची युती केली. या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता, त्या राजकारणात घडल्या. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं. काळाच्या पोटात काय दडलंय हे आताच सांगता येत नाही, असं सांगून रावसाहेब दानवे यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षाची महापालिका निवडणुकीत युती होते की दोन्ही पक्षांमध्ये अंडरस्टँडिंग होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9 मराठीशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. राजकारणात एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटतो. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. एक नेता दुसऱ्या नेत्याला भेटायला गेला तर राजकीय चर्चा होणारच. ती काही लपून राहत नाही. काल मी त्यांना भेटलो. तेव्हा त्यांनी मला पेढा दिला. त्यांच्या मुलाला मुलगा झाला म्हणून त्यांनी पेढा दिला. मी आजोबा झालो. मला नातू झाला. आताच पेढे आले. मी पहिला पेढा तुम्हाला देतो असं सांगत त्यांनी मला पेढा दिला. मीही त्यांना रेल्वे इंजिन भेट दिलं. त्यांचं निवडणूक चिन्ह रेल्वे आहे, त्यामुळे मी त्यांना रेल्वे इंजिन भेट दिलं. त्यांनी मला पेढा दिला, मी त्यांना रेल्वे इंजिन भेट दिलं, असं दानवे यांनी सांगितलं.
रेल्वेलगतच्या अतिक्रमणावर चर्चा
मुंबईच नाही तर देशभर रेल्वेच्या जागेवर काही अतिक्रमण झालं आहे. जळगाव-सुरत रेल्वे मार्गालगत अतिक्रमण झालं होतं. ते उठवण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई केली. त्याविरोधात झोपडपट्टीधारक कोर्टात गेले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही सूचना दिल्या. देशभरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणं हटवण्यास कोर्टाने सांगितलं. म्हणून रेल्वेने नोटीस द्यायला सुरुवात केली. त्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांनी त्याला विरोध केला. त्यानंतर मुंबईत बैठक घेतली. त्या बैठकीला सर्व पक्षीय नेते होते. पण मनसेचे नेते नव्हते. एक दिवस मला राज ठाकरेंचा फोन आला, या विषयावर आपण चर्चा केली पाहिजे. मी त्यांना सांगितलं अधिवेशनानंतर आपण चर्चा करू. काल अधिवेशन संपलं. मग बाळा नांदगावकरांशी बोलून साहेबांशी चर्चा केली, अशी माहिती त्यांनी दिली.
भूमिका बदलली तर काहीही होऊ शकतं
काळाच्या पोटात काय दडलं माहीत नाही. उद्या काय होईल माहीत नाही. संगमा, तारिक अन्वर, पवार यांनी सोनिया गांधी परदेशी असल्याचं सांगून काँग्रेसमधून बाहेर पडले. आता तेच पवार सोनिया गांधींशी युती करून सरकारमध्ये आहेत. बदलली ना भूमिका. बदलावी लागली ना, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतील हे वाटलं होतं का? भूमिका बदलावी लागली ना. मायावती आणि अखिलेश एकत्रं येतील असं वाटलं होतं का? पण आले एकत्र. नितीश कुमार आणि लालू प्रसाद एकत्र येतील वाटलं होतं का? परिस्थिती नुसार बदलावं लागतं. राज ठाकरेंनी भूमिका बदलली तर या गोष्टीचा विचार होईल. राज ठाकरे भूमिका बदलतील का माहीत नाही. मनसे भाजप युती होईल का हे माहीत नाही. काळाच्या पोटात काय दडलं हे सांगता येत नाही. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. एकत्र येईलच हे सांगता येत नाही. पण भूमिका बदलावी लागले. भूमिका बदलली तर काहीही होऊ शकतं, असं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरेंचं स्वागतच
राज यांनी त्यांच्या भाषणातून व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यांनी हिंदुत्व कधीच नाकारलं नाही. व्यापक हिंदुत्व केवळ भाजपकडे आहे. शिवसेनेकडे नाही. नमाज पढण्याचे क्लासेस घ्यायला लागले. यापेक्षा सत्तेसाठी लाचारी काय असली पाहिजे. बाळासाहेब असते तर… कोल्हापूरच्या निवडणुकीत जाऊन पाहा. एकेकाळी बाळासाहेबांचा फोटो आणि हिंदुत्व असं असायचं. आज कोल्हापुरात बाळासाहेबांच्या फोटोसोबत पंजा आणि काँग्रेस आहे. त्या लोकांना काय वाटत असेल. राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने चालले असतील तर स्वागतच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Sanjay Raut: महाराष्ट्रातील एका नेत्याच्या इशाऱ्यावर ईडीच्या कारवाया; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप