रत्नागिरी-सिंधुदुर्गत भाजप, शिंदे सेनेत रस्सीखेच, राणे अन् सामंत दोघांनी घेतले उमेदवारी अर्ज
शिवसेनेचे इच्छूक उमेदवार किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नागपुरातील फडणवीस यांच्या देवगिरी भेट झाली. त्यापूर्वी उदय सामंत यांनीही फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अजूनही रस्सीखेच सुरु आहे. या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले. त्यानंतर आता किरण सामंत यांनीही 4 उमेदवारी अर्ज घेतले आहे. यामुळे रत्नागिरी- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तिढा वाढला आहे. किरण सावंत यांनी नागपूर येथे जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली होती.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा तिढा निवडणूक जवळ आली तरी सुटलेला नाही. भाजप आणि शिंदे गटाकडून उमेदवारीबाबत रोज दावे प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेनेकडून किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत तर भाजपकडून नारायण राणे यांना उतरवण्यात येणार आहे. आता दोन्ही इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज घेण्यात आल्याने उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कारण या मतदार संघात ७ मे रोजी मतदान आहे. १२ एप्रिल ते १९ एप्रिलपर्यत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. म्हणजे उमेदवारी भरण्यासाठी फक्त ४ दिवस बाकी राहिले आहेत.
महायुतीचा उमेदवाराचे सस्पेंन्स कायम
उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी प्रचार सुरु केला आहे. परंतु महायुतीचा निर्णय होत नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे आजपासून दोन दिवस रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांनी उत्तर रत्नागिरी मतदार संघात सभांचा धडाका लावला आहे. चिपळूण तालुक्यातील पोफळी आणि चिपळूण शहरात आज सभा होणार आहे. तसेच उद्या संगमेश्वर आणि देवरूख शहरात सभा होणार आहे.
किरण सामंत अन् फडणवीस भेट
शिवसेनेचे इच्छूक उमेदवार किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नागपुरातील फडणवीस यांच्या देवगिरी भेट झाली. त्यापूर्वी उदय सामंत यांनीही फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. किरण सामंत म्हणाले, मला देवेंद्रजींनी येथे बोलावले होते. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि येथे शिवसेनेचाच उमेदवार निवडून येऊ शकतो,असे आपण त्यांना सांगितले आहे. माझी 100% तयारी झाली आहे. फक्त पेपर सोडवायचा आहे. एनडीएला 400 पार करायचा असेल तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे मान्य करावंच लागेल. त्यानंतर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे त्यांनी म्हटले.