“त्या निवडून आल्या असत्या तर…”, नवनीत राणांच्या पराभवाबद्दल रवी राणा यांचे मोठे वक्तव्य
जर असंच होत राहिलं तर राजकारणात चांगले लोक राहणार नाहीत", असेही रवी राणा यांनी म्हटले.
Ravi Rana On Navneet rana : महाराष्ट्रातील अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी अमरावतीतील भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला. या दोघांमध्ये चांगलीच चुरशीची लढाई पाहायला मिळाली. आता यावरुन नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी भाष्य केले आहे. “नवनीत राणांनी पाच वर्षे अनेक विकास कामे केली. लोकांशी जनसंपर्क ठेवला. पण तरी त्यांना निवडणुकीत घरी बसावं लागलं. त्या निवडून आल्या असत्या तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या”, असे विधान रवी राणा यांनी केलं आहे.
सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या रवी राणा हे जोरदार तयारीला लागले आहेत. नुकतंच त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्या पराभवाबद्दल भाष्य केले. “जर असंच होत राहिलं तर राजकारणात चांगले लोक राहणार नाही”, असे वक्तव्य रवी राणा यांनी केले.
“…तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या”
“गेली पाच वर्षे नवनीत राणा यांनी अनेक विकास कामे केली. त्यांनी लोकांशी चांगला जनसंपर्कही ठेवला. मात्र तरीही त्यांना निवडणुकीत घरी बसावं लागलं. नवनीत राणा जर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्या असत्या, तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या”, असे रवी राणा म्हणाले.
“राजकारणात चांगले लोक राहणार नाहीत”
“नवनीत राणा यांनी गेली पाच वर्षे विकास केला. खूप मेहनत केली. पण आता ती खड्ड्यात गेली. अमरावतीत आता अशी हवा आली आहे की जो २० दिवसांपूर्वी आला तो निवडून आला. जर असंच होत राहिलं तर राजकारणात चांगले लोक राहणार नाहीत”, असेही रवी राणा यांनी म्हटले.
“फक्त नवनीत राणा यांचाच नाही तर अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झाला आहे. काही मुठभर नेत्यांनी ठरवलं होतं की नवनीत राणा यांचा पराभव करायचा, पण लक्षात ठेवा त्यांच्या मनासारख झालं असलं तरी या जिल्ह्याचा विकास थांबला आहे. अनेकांनी म्हटलं की आग लगी है तो धुव्वा निकलेगा, लेकीन ध्यान रखना आग यहाँ लगी है, तो वहा भी आग लगने वाली है”, असेही रवी राणा यांनी म्हटले.
“जनतेची ताकद माझ्यासोबत”
तसेच यावेळी त्यांनी बच्चू कडूंवरही टीका केली. “काही नेत्यांनी मला पाडायचं हे ठरवलं असलं तरीही जनतेची ताकद माझ्यासोबत आहे. ते मला धक्का लागू देणार नाही”, असे रवी राणा म्हणाले.