अजित पवार गटातील प्रदेश नेता शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत, ‘सिल्व्हर ओक’वर जावून…
Jalgaon News | शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे रवींद्र नाना पाटील काय निर्णय घेतात याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यामुळे आता रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
जळगाव | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी आता अजित पवार गटातील नेत्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या गाडीवर घड्याळ ऐवजी तुतारी आली आहे. त्याचवेळी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा मार्गवार आहे. रवींद्र पाटील शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत पोहचले आहे.
मुंबईत भेटीसाठी बोलवले…
जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी आणि अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील सिल्व्हर ओकवर जावून शरद पवार यांची भेट घेणार आहे. रवींद्र नाना पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रावेर लोकसभा संघातून उमेदवारी देण्याची ऑफर आली आहे. शरद पवार गटाकडून ऑफर आल्याची रवींद्र नाना पाटील यांनीच ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले. यामुळे आता शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीत रवींद्र नाना पाटील यांची नेमकी काय चर्चा होते, याकडे लक्ष लागले आहे.
सासरे सून-लढत टाळणार
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी फोन केले जात आहेत. यामुळे रवींद्र पाटील यांनाही फोन आला. रावेरमधून भाजपने राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसेला उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु सून आणि सासरे लढत टाळण्यासाठी आता रवींद्र पाटील यांचे नाव पुढे आले आहे.
रवींद्र पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष
शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे रवींद्र नाना पाटील काय निर्णय घेतात याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यामुळे आता रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.