Jalna : कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा, रावसाहेब दानवेंचं खुलं आव्हान
कुणी मायीचे दुध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा, असं खुलं आव्हान भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकरांना दिलं आहे.
जालना : जालन्यात जाऊन किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकरांवर भष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर पुन्हा दानवे आणि खोतकरांमधला जुना संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. अर्जुन खोतकरांनी दानवेंकडे इशारा केल्यानंतर आता रावसाहेब दानवेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यावर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गोटातून आरोप-प्रत्यारोप होताना पहायला मिळत आहेत.
दानवेंचं खोतकरांना खुलं आव्हान
कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा, असं खुलं आव्हान भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकरांना दिलं आहे. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. रामनगर साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी गैरकारभार झाल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी या सर्व प्रकरणात किरीट सोमय्या यांचा बोलवता धनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. याबाबत आज रावसाहेब दानवे यांनी जालना शहरातील विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात खुलासा केलाय.
माझ्या नावाने बोंबलून फायदा नाही
मी गरीब माणूस आहे, माझ्या नावाने बोंबलून काही फायदा नाही. ज्या गावात मतदान बुथ नव्हते, त्या गावचा मी आज केंद्रात मंत्री आहे, असंही दानवे म्हणाले आहेत. मी कोणावर कशाचाही आरोप केलेला नाही, माझ्या अंगाला कुठलाही भ्रष्टाचार चिटकलेला नाही आणि असेल तर कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवावा, असं खुलं आव्हानच दानवेंनी देऊन टाकलं आहे.