धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? महायुतीच्या दोन बड्या नेत्यांकडू सूचक वक्तव्य, नेमकं काय घडतंय?
सध्या राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे, या प्रकरणावरून विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता महायुतीच्या नेत्यांकडूनही यावर सूचक विधान करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलं आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. यावर आता महायुतीच्या नेत्यांकडून सूचक प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं की, धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही असं महाजन यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.
बीडचा नवा पालकमंत्री कोण?
दरम्यान अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तर त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खात्याचं वाटप देखील झालं. मात्र अजूनही पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आलेलं नाहीये, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडचं पालकमंत्रिपद देखील चांगलंच चर्चेत आलं आहे. गेल्या टर्ममध्ये धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र यावेळी पालकमंत्री कोण होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
विरोधकांकडून धनंजय मुंडेंवर सातत्यानं आरोप होत आहेत. त्यामुळे दुसरं कोणाला पालकमंत्रिपद मिळणार की? पुन्हा एकदा धनंजय मुंडेच बीडचे पालकमंत्री होणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मोठं व्यक्तव्य केलं आहे. बीडचा पालकमंत्री कोण असणार याबाबत निर्णय मी अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून घेऊ, बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.