Eknath Shinde: बंड एकनाथ शिंदेंचं, फटका शिवसेनेला, फायदा मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांना.. वाचा नेमकं काय घडलंय?
नऊ जण हे गुवाहाटीत असल्याने शिवसेनेकडे सध्या पाचच मंत्री उरले आहेत. या नव्या फेरबदलात त्यामुळे राज्यमंत्र्यांची सर्वच खाती ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांना देण्यात आली आहेत.
मुंबई- शिवसेनेतील (Shivsena)बंडखोरीचा फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (Congress-NCP)मंत्र्यांना झाल्याचे समोर आले आहे. शिवसेनेतील नऊ मंत्री आणि राज्यमंत्री हे गुवाहाटीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जनहिताची कामे अडू नयेत म्हणून मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. नऊ जण हे गुवाहाटीत असल्याने शिवसेनेकडे सध्या पाचच मंत्री उरले आहेत. या नव्या फेरबदलात त्यामुळे राज्यमंत्र्यांची सर्वच खाती ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांना देण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आली आहेत. गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे देण्यात आले आहे. दादा भुसे यांच्याकडील कृषी व माजी सैनिक कल्याण खाते आणि संदिपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आले आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे
राज्य मंत्र्याची खाती काँग्रेस-राष्ट्रवादीकडे
शिवसेनेची राज्यमंत्र्यांची जबाबदारी ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांना करण्यात आले आहे. यात राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडे, दत्ता भरणे यांना तर काँग्रेसच्या सतेज बंटी पाटील, विश्वजीत कदम यांना देण्यात आली आहेत. या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना या बंडाचा फायदा झाला असेच म्हणावे लागेल.
खातेवाटप शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) राष्ट्रवादीच्या संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण) यांच्याकडे देण्यात आले आहे.
राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) काँग्रेसच्या विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), राष्ट्रवादीच्या प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग), काँग्रेसच्या सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन), राष्ट्रवादीच्या आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) यांना देण्यात आली आहेत.
अब्दुल सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) राष्ट्रवादीच्या प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), काँग्रेसच्या सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), राष्ट्रवादीच्या आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य) यांच्याकडे सोपवण्यात आलीत.
ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात) राष्ट्रवादीच्या आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), काँग्रेसच्या सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), राष्ट्रवादीच्या संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), राष्ट्रवादीच्या दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) असे वाटप करण्यात आले आहे.