पालिका सकाळी सकाळी अॅक्शन मोडवर, शिवसेना भवनच्या बाजूचे अतिक्रमण काढण्यास सुरवात, मोठा पोलिस बंदोबस्त
शहराची मुख्य बाजार पेठ असलेल्या शालीमार परिसरातील शिवसेना भवनच्या बाजूचे अतिक्रमीत दुकाने काढण्यात महानगर पालिकेने सुरुवात केली असून नाशिककर या कारवाईचे स्वागत करत आहे.
नाशिक : नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शालिमार चौकातील 25 हून अधिक दुकानांवर आज पालिका प्रशासनाने जेसीबी चालवत ही अतिक्रमित दुकाने जमिनदोस्त केली आहे. भल्या पहाटे पालिका प्रशासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही दुकान हटवली आहे. तेथील अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना पालिका प्रशासनाने वेळोवेळी नोटीसा देऊनही ही अतिक्रमण हटवण्यात आले नाही, त्यानंतर पालिका प्रशासनाने ही धडक कारवाई करत या भागातील सगळी दुकान जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली आहे. नाशिक महानगर पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईचं नाशिककरांनी स्वागत केले आहे.
नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या या दुकानांमुळे या भागातील रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता मात्र पालिका प्रशासनाने उशिरा का होईना ही कारवाई केल्याने या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे भविष्यकाळात अशीच कारवाई संपूर्ण शहरात करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
नाशिकच्या शालीमार परिसरात खरंतर दुकानदारांनी मोठया प्रमाणात अतिक्रमण केले आहे. पालिकेच्या माध्यमातून दुकानदारांना अनेकदा नोटिसा देण्यात आल्या होत्या. अतिक्रमीत असलेली ठिकाणं तात्काळ खाली करा असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही दुकान मालकांनी अतिक्रमण काढले नव्हते.
नाशिक महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने भल्या पहाटे पोलिसांचा मोठा बंदोबस्त घेऊन जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमन काढण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये 25 हून अधिक दुकाने जमीनदोस्त केली जात आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुकान मालकांनी कारवाई थांबविण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पालिकेने तो जुगारून लावत ही कारवाई केली आहे.
खरंतर नाशिक महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या या कारवाईचे नाशिक करांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. सोशल मिडियावरही या कारवाईवरुन प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामध्ये पालिकेने शहरात अशीच कारवाई केली तर संपूर्ण शहर मोकळा श्वास घेईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.
मुख्य बाजार पेठ असलेल्या ठिकाणी असेच अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यामुळे रहदारीला मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे अतिक्रमण विभाग अॅक्शन मोड वर आला असून कारवाईला सुरुवात केली आहे. शिवसेना भवन बाजूलाच ही कारवाई करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
खरंतर कारवाई केल्यानंतर दुकानदार पुन्हा दुकानं सुरू करत असतात. त्यामुळे कारवाईनंतरही पालिकेने लक्ष ठेऊन अतिक्रमण होण्या अगोदरच लक्ष दिल्यास भविष्यात पुन्हा कारवाई करण्याची वेळ येणार नाहीये.