राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर; दिघे, मेटे आणि दि. बा. पाटील यांचं दिलं नाव
आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठीक राज्यातील काही आयटीआयचे नामकरण करण्यात आले आहे. या आयटीआयना दि.बा पाटील, बाबासाहेब आंबेडकर, आनंद दिघे, विनायक मेटे यांच नावे देण्यात आली आहेत.
राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्यात आले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतला असून आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे. ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जेथे शिकले त्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या आयटीआयला विनायक मेटे यांचे नाव देण्यात आले आहे. नवी मुंबईतील आयटीआयला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. याशिवाय लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धान उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (विधी व न्याय) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग यासाठी १४८६ कोटीचा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे.
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड देण्यात येणार आहे. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद असं करण्यात आले आहे. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड केली जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करण्यासाठी दिल्या जाणार आहेत. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले जाणार आहे. राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीत समावेश केला जाणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मुळ मालकांना परत केल्या जाणार आहेत. दूध अनुदान योजना सुरु राहणार आहे. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील सरपंच आणि उपसरपांचाच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर दिघेंचे नाव देण्यात आले आहे. पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात आसे आहे. सर्वसामान्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विनायकराव मेटेंचे कार्य मोठे आहेत. त्यामुळे त्यामुळे सरकारकडुन एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांचं ही नाव देण्यात आलं आहे.