कल्याण : कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड सध्या एका वादामुळे चर्चेत आले आहेत. शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने ते सध्या देशभरात चर्चेत आहेत. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. अतिशय संयमी आणि शांत नेते म्हणून ओळख असलेले गणपत गायकवाड यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न सगळीकडेच विचारला जात आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे.
गणपत गायकवाड हे सलग तीन वेळा कल्याण पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत. २००९ आणि २०१४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
गणपत गायकवाड हे दर रविवारी जनता दरबार चालवतात. या माध्यमातून ते लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही अडचणी असले की नागरिक या जनता दरबारात येतात. कल्याण पूर्वेत कोणतीही समस्या सोडवण्यासाठी दिलेला शब्द पाळतात अशी त्यांची ओळख आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क वाढला आहे.
आमदार गणपत गायकवाड हे त्यांना आमदार म्हणून मिळणारा पगार हा गरजू विद्यार्थ्यांना देत असतात. त्यामुळे मतदारसंघात देखील त्यांची बरीच चर्चा असते. वाढदिवशी देखील ते भेट म्हणून शिक्षण उपयोगी वस्तू देण्याचा आग्रह धरतात. जेणेकरुन ते त्या गरजू विद्यार्थ्यांना मिळू शकतील.
या शिवाय गरजुंना मोफत औषधे, दरवर्षी विविध शिबिरे आणि मतदारसंघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मदत याबाबतीत ही ते पुढे असतात.
आमदार गणपत गायकवाड यांनी सुरवातीला उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा देखील चालवली असल्याचं म्हटलं जातं. यानंतर आमदार गणपत गायकवाड केबलच्या व्यवसायात आले. केबलच्या व्यवसायात त्यांनी बरीच प्रगती केली. यशस्वी उद्योजक झाल्यानंतर त्यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन वेळा ते अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
द्वारली गावात एकनाथ जाधव यांच्या मालकीचा भूखंड गणपत गायकवाड यांच्या कंपनीने १९९६ साली विकत घेतला होता. तीन वेळा पैसे दिल्यानंतर एकनाथ जाधव कुटुंब हे नोंदणी कार्यालयात येत नसल्याने गणपत गायकवाड यांनी न्यायालयीन लढाई लढून या भूखंडाची मालकी मिळवली होती. त्यानंतर या भूखंडाला कुंपण घालण्याचे काम सुरु असतानाच शुक्रवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांसोबत महेश गायकवाड यांनी या भूखंडावर कुंपणाचे नुकसान केले. त्यानंतर याची तक्रार दाखल करण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. हिललाईन पोलीस ठाण्याच्या कर्मचारी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे वैभव गायकवाड यांनी आमदार गणपत गायकवाड यांना सांगितले.
यादरम्यान महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे देखील पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड हे देखील या ठिकाणी पोहोचले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात दोन्ही गट बसले होते. या दरम्यान वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड समर्थकांमध्ये बाहेप वाद झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप वाद मिटवण्यासाठी बाहेर गेले. त्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली.
माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. राहुल पाटील आणि अन्य 70 जणांच्या विरोधात हिल लाईन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठलीही परवानगी न घेता जागेवर कब्जा करण्यासाठी सशस्त्रपणे मोठ्या संख्येने जमा झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगारांना शिवीगाळ करत जागेवरील सामानाचे नुकसान केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. या गुन्ह्यात तीन महिलांचाही समावेश असून हिल लाईन पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला आहे. महेश गायकवाड, राहुल पाटील यांची देखील पोलिसांकडून चौकशी होणार आहे.