‘अनुभव नसताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपद’, आदित्य ठाकरेंवरील दादांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रीपदावर प्रश्न उपस्थित करत शिवसेनेवर टीका केली. त्यांच्या याच टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं (NCP Rohit Pawar).
मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रीपदावर प्रश्न उपस्थित करत शिवसेनेवर टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. “तुमच्या सत्ताकाळात मंत्रीपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळं तर तुम्ही ‘अनुभवावर’ बोलत नाहीत ना?”, असा उपरोधिक सवाल रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना ट्विटरवर विचारला (NCP Rohit Pawar).
“भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं काम बघावं. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भूमिका पार पाडा”, असा टोला रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना ट्विटरवर लगावला (NCP Rohit Pawar).
.@ChDadaPatil अनुभवापेक्षा @AUThackeray जी यांचं काम बघा. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा जबाबदार विरोधकाची भूमिका तुम्ही पार पाडू शकता, असं मला वाटतं.
तुमच्या सत्ताकाळात मंत्रीपदाचाही अनुभव नसताना एका व्यक्तीला थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळं तर तुम्ही ‘अनुभवावर’ बोलत नाहीत ना?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 1, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची ‘सामना’ वृत्तपत्राच्या संपादकपदी निवड करण्यात आली. ‘सामना’ हे वृत्तपत्र शिवसेनेचं मुखपत्र आहे. रश्मी ठाकरे यांच्या संपादकपदी निवड झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिपदावरही प्रश्न उपस्थित केले. “कुठलाही अनुभव नसताना उद्धव ठाकरेंनी मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं”, अशी चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.
चंद्रकांत पाटील यांच्या याच टीकेला रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रत्युत्तर दिलं. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत निशाणा साधला.
दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी आज ट्विटरवर राष्ट्रवादीवर टीका केली. त्या टीकेलादेखील रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. “भाजपवर सध्या आलेले बुरे दिन हे अहंकाराचं फळ आहे”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
भारतीय जनता पक्षाचे सुरवातील दोन खासदार होते. आज केंद्रात फक्त तूमच्या पक्षासाठी आलेले “अच्छे दिन” हे तूमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले “बुरे दिन” हे अशाच अहंकाराचं फळ आहे. #आत्ता_तरी_सुधरा_राव @ShelarAshish https://t.co/aIMXaZEiSr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 1, 2020
संबंधित बातमी : …पण आता ठाकरे सगळंच घेताहेत, ‘सामना’ संपादक पदावरुन चंद्रकांत पाटलांचा टोला