नागपुरात काय घडतंय?… शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये मोठी खलबतं; चर्चा कशावर?
राज्यात विधानसभा निवडणुका कधीही लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागा वाटपाच्या चर्चेच्या फेरीही होत आहे. जिथे शक्य होईल आणि वेळ मिळेल तिथे राजकीय पक्षांकडून जागा वाटपाचे प्रश्नमार्गी लावले जात आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात होते. नागपुरात या तिन्ही नेत्यांनी जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज नागपुरात होते. तिघेही एकाच मंचावर होते. हा कार्यक्रम संपल्यानंतरही हे तिन्ही नेते नागपुरातच आहेत. नागपुरात या तिन्ही नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे या बैठकीत तीनच नेते असल्याने या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर महायुतीची बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा फॉर्म्युला या बैठकीत ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. या शिवाय महायुतीतील जे मित्र पक्ष आहेत, त्यांना सर्वांनी मिळून जागा सोडायच्या की तीन पक्षांनी आपल्या वाट्याला आलेल्या जागा मित्र पक्षांना द्यायच्या यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अजितदादा गटाचा 80 जागांचा आग्रह आहे. पण 60 जागाही लढण्याची तयारी अजितदादा गटाने दर्शवली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला किती जागा हव्यात याचा पत्ता उघड केलेला नाही. आजच्या बैठकीत त्यावरही चर्चा होऊ शकते. कुणी किती जागा लढवायच्या हे आजच्या बैठकीत ठरू शकते, असंही सांगितलं जात आहे.
अदलाबदलीवर चर्चा
या बैठकीत जागांच्या अदलाबदलीवरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एखाद्या विद्यमान आमदाराच्या मतदारसंघात त्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल आणि मित्र पक्षाकडे स्ट्राँग उमेदवार असेल तर ती जागा मित्र पक्षाला सोडण्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. असे किती मतदारसंघ असू शकतात याचीही चर्चा या बैठकीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
बेताल विधानांवर चर्चा
महायुतीतील काही नेते बेताल विधाने करत आहेत. त्याचा परिणाम महायुतीवर होत असून महायुतीतच नेत्यांमध्ये जुंपली जात आहे. शिंदे गटाचे नेते, आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संताप पसरला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्येच जुंपल्याचं चित्र जात आहे. यावरही या बैठकीत चर्चा होणार असून वाचाळवीरांना आवर घालण्यावरही एकमत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.