जितेंद्र आव्हाड यांच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरुन वादळ, आता जितेंद्र आव्हाड म्हणतात…
Jitendra Awad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा वाद निर्माण केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन 80 टक्के लोकांवर अन्याय केला, असे वक्तव्य केले होते. आता त्यावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
नागपूर, दि.17 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांच्यावरुन केलेल्या वक्तव्यावरील वाद शांत झाला नाही. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात विधान केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन 80 टक्के लोकांवर अन्याय केला. कारण आता न्यायव्यवस्थेत ज्या काही बाबी पुढे येत आहे त्यावर न बोललेले बरे, असे आव्हाड म्हणाले होते. त्यावर बुधवारी नागपुरात बोलताना आरक्षणाचा विषय मी काल मांडला आणि तिथेच संपवला. मी माझी शंका उपस्थित केली, असे स्पष्टीकरण दिले. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत आव्हाड यांनी माफी मागावी, शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांची पक्षातून हाकलपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
आज काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
बाबासाहेबांनी आरक्षण म्हणजे आर्थिक उन्नतीचे साधन ठेवले नव्हते. ज्यांना शिक्षण नाही. त्यांना शिक्षण नाही, घर नाही, शेती नाही. ज्यांना समाजाने मान्यता दिली नाही त्या लोकांना मुख्य धारेत आणण्यासाठी आरक्षण तयार केले. शिक्षणाची गंगा सर्वत्र नेण्याचा बाबासाहेब आणि महात्मा फुले यांचा विचार होतो. परंतु आता खासगी शाळा आल्या. यामुळे झोपडपट्टीतील मुले कुठे जाणार शिक्षणाला? मी माझे विचार मांडत असतो. मी कोणालाही जबरदस्ती करत नाही की माझ्या विचारांना मान्यता द्या.
सचिन खरात आक्रमक
आमदार जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, संविधाननिर्माता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी केलेले विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऑडिट करणे इतपत देशात कोणीच मोठे नाही. तुमची तर लायकीच नाही. संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये न्यायव्यवस्थेला स्वायत्त ठेवलेले आहे. यामुळे न्यायाधीशाला न्याय देताना जात, धर्म, लिंग, भाषा, वर्ण हा कोणताही विषय समोर येऊ नये म्हणूनच न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आपण जे संविधान निर्माता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जे वक्तव्य केले आहे या वक्तव्याची तात्काळ माफी मागावी. तसेच शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
सुशीलकुमार शिंदे म्हणतात…
जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तीक मत असणार आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्यामध्ये त्यांना माहिती होते की न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण द्यावे की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चिंतन करून ते केलेले आहे. त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र जी घडलेली घटना आहे त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही.