महाविकास आघाडीत बिघाडी? महत्त्वाचा पक्ष बंड पुकारण्याच्या तयारीत
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपात होत असलेल्या विलंबावरून नाराजी व्यक्त केली आहे. उद्यापर्यंत जागावाटप जाहीर न झाल्यास समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी शरद पवार यांची भेट घेत पाच जागांची मागणी केली. पाच जागा न मिळाल्यास आपण २५ जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. “महाविकास आघाडीच्या जागावाटपात होत असणारा उशिर हा चुकीचा आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप उद्यापर्यंत जाहीर झालं नाही तर समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार. समाजवादी पक्षाचे 5 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आम्हाला 5 जागा मिळाव्यात ही विनंती मी शरद पवारांकडे केली. आम्हाला तितक्या जागा न मिळाल्याल आम्ही 25 जागांवर स्वातंत्र्य लढणार”, अशी घोषणा अबू आझमी यांनी केली. “मी पाच उमेदवार दिले आहेत. मी वाट बघू शकत नाही. सरकार बनवायचं आहे. मात्र फार वेळ जात आहे. ही खूप मोठी चूक आहे. लोक या ठिकाणी अजून उभे आहेत. माझे 25 उमेदवार आहेत. मला यांनी सांगावे. नाहीतर मी लढतो. मविआच्या नेत्यांनी उत्तर द्यावे. कारण शेवटी हे लोक धोका देतात”, अशी भूमिका अबू आझमी यांनी मांडली.
“दिल्ली येणे-जाणे सुरु आहे. दिल्लीवाले काय करतील? मी अध्यक्ष आहे. माझ्याकडे एबी फॉर्म आहे. मी हवा त्याला वाटून देणार. अनुशक्ती नगर, भायखळा, वर्सोवा या ठिकाणी उमेदवार आहेत. माझे उमेदवार शरद पवारांनी मागितले तर जातील”, असं अबू आझमी म्हणाले.
‘नवाब मलिक येऊ द्या समोर, काय होतं ते बघू’
“नवाब मलिक येऊ द्या समोर, लढू द्या, काय होतं ते बघू. मायनरीटीवाले लोक, आंबेडकरवादी, आदिवासी विचारांचे लोक भाजपला मतदान करत नाहीत. मी स्वतंत्र झालो तर मी 25 उमेदवार देणार. सन्मानाने बोलू आणि विषय संपू, असं शरद पवार म्हणाले”, अशी माहिती अबू आझमी यांनी दिली.
‘आपल्या लोकांच्या विरोधात उभे राहणार का?’, अबू आझमी यांचा सवाल
यावेळी अबू आझमी यांवी झिशान सिद्दीकी यांच्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. झिशान सिद्दीकी यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे. याबाबत अबू आझमी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “निवडून आले आणि वफ्फ बोर्ड बिल आल्यावर काय म्हणणार? आपल्या लोकांच्या विरोधात उभे राहणार का?”, असा सवाल आझमी यांनी केला.