‘माझ्यासारखे राजकारणी लबाड लोकं…’, भिडे गुरुजी नेमकं काय म्हणाले?
मराठा आरक्षणासाठी राज्यातलं वातावरण तापलं आहे. मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. त्यांचं उपोषण सुरु होवून आता आठ दिवस पूर्ण होतील. राज्य सरकारकडूनही हालचाली सुरु आहेत. पण मराठा आरक्षणाच्या पेचावर तात्काळ तोडगा निघालेला नाही. यावर संभाजी भिडे यांनी मोठं वक्तव्य केलंय.
पुणे | 1 नोव्हेंबर 2023 : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापकचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आज मराठा आरक्षणावर भाष्य करताना मोठं वक्तव्य केलं आहे. मरठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर याआधी 24 ऑक्टोबरला प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतलं होतं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांवर विश्वास ठेवा, असं संभाजी भिडे म्हणाले होते. पण आज त्यांनी या विषयावर भाष्य करताना अजित पवार यांचं नाव टाळलं आहेत. त्यांनी फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलंय. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विलंब का होत आहे, यावर भाष्य करताना मोठं वक्तव्य केलंय.
“साधी गोष्ट आहे. पंगत बसलेली आहे. पंगतीत 90 पानांवर वाढलंय. पण 10 पानांवर वाढलेलं नाही. इतका साधा प्रश्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं की नाही? हा चर्चेचा मुद्दा असूच शकत नाही. ते मिळणार का? उद्या सूर्य उगवणार का? याचं जे उत्तर आहे तेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. शंभर टक्के! हा प्रश्न रेंगाळला, लांबला. आपण सगळे कुठलाही पक्ष, पंथ, सामुदाय कुठलेही असो पण आपण सगळे एक आहोत. आपण एक आहोत ते हिंदुस्तानमुळे. या हिंदुस्तानचा प्राण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात म्हणजे मराठा समाजात आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले.
‘माझ्यासारखे राजकारणी लबाड लोकं…’
“ही समस्या शंभर टक्के सुटणार आहे. हे लांबलं याचं कारण मी स्वत:लाच म्हणून घेतो. माझ्यासारखे राजकारणी लबाड लोकं आहेत. हे चिघळताच कामा नये. जरांगे पाटलांनी लक्षात घेतलं पाहिजे की, उद्या सूर्योदय होणार आहे. शंभर टक्के होणार आहे. लहान लेकरु चालायला शिकताना आईच्या पावलावर पाऊल टाकतं. तसंच थोडं आपण लक्षात घेतलं पाहिजे. होणार आहे. शंभर टक्के होणार आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले.
“याचं नेतृत्व जरांगे पाटलांकडेच राहीलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. माझ्यासारखे आत एक आणि बाहेर एक असले राजकारणी लोक यात नको. पण भगवंतच्या कृपेने अपवाद असतो. आताचे जे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आणि मी, मी कुठल्या पक्षात नाही. पण कलम काय आहे आणि मी काय ते मला ठाऊक आहेत”, असं संभाजी भिडे म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस राजकारणात कसे आहेत, ह्या… देवेंद्र काय आणि एकनाथराव काय, ही दोन्ही माणसं राजकारणाच्या पलिकडे देशाचाच विचार करुन जगणारी आहेत हे पक्क लक्षात ठेवा. ही माणसं बनवणार नाहीत. लबाडीने बोलणार नाहीत. स्वत:चा हस्त राखून चालणार नाहीत. पण चालत राहूया. लवकरात लवकर हे सुटतंय”, असा विश्वास संभाजी भिडे यांनी व्यक्त केला.