आसाराम बापूचा संप्रदाय अद्याप संपला नाही; शिवसेनेच्या माजी खासदारांचे अजब विधान, चर्चेला मोठे उधाण
Asaram Bapu : आसूमल थाऊमल सिरुमलानी म्हणजे आसाराम बापू बालात्कार प्रकरणात दोषी ठरला. त्याला बलात्कार प्रकरणात 6 महिन्यांचा तात्पुरता जामीन मिळाला आहे. त्यातच शिवसेनेच्या या माजी खासदाराने बापूचा संप्रदाय संपलेला नाही असे अजब विधान केले आहे.

आसाराम बापूने देशात मोठे वलय तयार केले होते. आध्यात्मिक चॅनल सुरू होण्यापूर्वीच या बाबाची मोठी ख्याती जगभरात पसरली होती. भारतात आजही त्याचे अनेक अनुयायी आहे. बलात्कार प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. पुढे खटला सुरू झाला. याप्रकरणात तो दोषी आढळला. त्यानंतर त्याच्या संप्रदायाला ओहोटी लागली. तरीही त्याचे अनेक भक्त अखिल भारतीय श्री योग वेदांत सेवा समिती आणि इतर संस्थांमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान आसाराम बापूचा संपद्राय अजून संपलेला नाही, असे अजब विधान उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
आसारामला तात्पुरता जामीन
आसाराम बापूला एका तरुणीवर बलात्कार प्रकरणात शिक्षा ठोठावली. 25 एप्रिल 2018 रोजी जोधपूर येथील न्यायालयाने त्याला आजीवन कारवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यापूर्वीपासून तो तुरुंगात होता. त्याला 11 वर्षानंतर सहा महिन्यांचा तात्पुरता जामीन मिळाला आहे. अर्थात या काळात त्याला कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही. 2013 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्यानंतर आसारामविरोधात इतर महिलेने सुद्धा बलात्काराचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला होता.




आसाराम बापू दोषी सिद्ध झाले नाहीत
दरम्यान उद्धव ठाकरे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आसाराम बापूचा संप्रदाय संपलेला नाही, असे अजब विधान केले. एकीकडे आसाराम बापूला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावलेली असताना खैरे यांनी बापू अजून दोषी सिद्ध झाले नसल्याचे अजब दावा केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बापू सध्या सहा महिन्यांच्या तात्पुरत्या जामीनावर बाहेर आला आहे.
आसाराम बापूचा संप्रदाय संपलेला नाही. देशभरात त्यांचे अनुयायी आहेत. ते सर्व त्यांची पूजा अर्चा, सण त्याच जोमाने करतात, असे खैरे म्हणाले. आसाराम बापूला अटक झाली, त्यावेळी आपण दिल्लीत होतो. त्यांच्या अटकेविरोधात जंतरमंतरवर भक्तांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी आपण पण आसारम बापूच्या समर्थनार्थ गेलो होतो असे खैरे म्हणाले.