पोलिसांना ट्रॅक्टर आंदोलनाची भीती, मनोज जरांगे यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी नोटीसा?
Police Notice to Maratha Reservation Andolak : मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करत आहेत. अशातच मनोज जरांगे यांचं हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी नोटीसा दिल्या जात असल्याचं समोर आलं आहे. या नोटीशीतच नेमकं काय? नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...
दत्ता कानवटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 21 डिसेंबर 2023 : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन सुरु आहे. यासाठी आंदोलन करणाऱ्या मराठवाड्यातील मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावल्या जात आहेत. 24 तारखेच्या अलटीमेटमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. ट्रॅक्टर धारक व्यक्तींनाही पोलिसांनी नोटिसा बजावल्या जात आहेत. ट्रॅक्टर घेऊन मराठा समाज मुंबईला येण्याची पोलिसांना भीती आहे. त्यामुळे शेकडो मराठा कार्यकर्त्यांनावर पोलिसांची करडी नजर आहे. 24 तारखेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडवर आहे. अशातच या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्हयातील कंधार पोलीसांनी ट्रॅक्टर चालकांना नोटीसा पाठवल्या आहेत. मराठा नेते , कार्यकर्ते आपल्याकडे ट्रॅक्टर मागण्यासाठी आले तर देऊ नये , किंवा आपण स्वतः ट्रॅक्टर सोबत घेऊन जाऊ नये, अशा आशयाची नोटिसा पोलीसांनी ट्रॅक्टर चालकांना दिल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी येत्या 24 डिसेंबर रोजी मुंबईत मराठा समाज मोठया संख्येने जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातून मराठा बांधव ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जातील, अशी शक्यता असल्याने ट्रॅकटर चालकांना नोटीसा देण्यात आल्या. ट्रॅक्टर घेउन गेल्यास वाहतुकीस अडथळा, लोकांची गर्दी होईल. त्यांच्याकडून जाळपोळ , गाड्या फोडणे, असे अनुचित प्रकार घडू शकतात. तसं काही झाल्यास आपल्याला जबाबदार धरून कारवाई करुन ट्रॅकटर जप्त केल जाईल असा इशाराही नोटीसीत देण्यात आला आहे.
जरांगे यांची प्रतिक्रिया
मराठा आंदोलकांना दिलेल्या या नोटिसांवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या पुढे अधिकारी कसे जाऊ शकतात? अधिकारी जाणूनबुजून नोटीस कसं काय देऊ शकतात?, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे.
आम्ही कधी कोणत्या जातीविषयी बोलत नाही. पण त्याला आम्ही सोडणार नाहीत. ते आमच्या जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत, आम्ही शांत आहोत पण शांत राहणार नाही. मराठवाड्यातील काही अधिकारी जातीयवाद करत आहेत. त्यांना कामावरून कमी केलं पाहिजे. सरकार गोरगरीब लोकांवर दबाव आणत आहेत तुम्हाला अधिकारी सांभाळायचे आहेत, असं जरांगे म्हणालेत.