नाशिक नंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव वाढला, नेमकं काय घडतंय?
छत्रपती संभाजीनगरमधील सीटी चौक पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला आहे. महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरुन संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी निर्माण झाली.
नाशिकच्या भद्रकाली परिसरातील तणावानंतर आता छत्रपती संभाजीनगर शहरातही तणावाची परिस्थिती असल्याची माहिती समोर येत आहे. पण या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून आज नाशिक शहर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच सकल हिंदू समाजाची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाली होती. यावेळी भद्रकाली परिसरात दुकानं बंद करण्याच्या मुद्द्यावरुन दोन गटात वाद झाला. पण पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळख मोठा बंदोबस्त परिसरात तैनात केली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रणात आणली. यानंतर आता छत्रपती संभाजीनगर शहरात तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील सीटी चौक पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला आहे. महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरुन संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी निर्माण झाली. महंत रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी घेऊन जमाव सीटी चौक पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.
आंदोलकांकडून पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महंत रामगिरी महाराजांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आंदोलक उभ्या असलेल्या पोलीस ठाण्याबाहेर मोठी मार्केट आहे. या मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मार्केटमधील सर्व दुकाने बंद आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण शहरात एसआरपी पोलीस पथक आणि महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचारी तैनात आहेत. पोलिसांकडून परिस्थितीत नियंत्रणात राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात वैजापूर आणि येवल्यात गुन्हा दाखल झाला आहे. “हिंदूंच्या असंघटीतपणा फायदा घेतला गेलाय. जेव्हा नोटीस येईल तेव्हा बघू”, असं रामगिरी महाराज म्हणाले आहेत. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या जमावाच्या शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन दिलं आहे. महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय.
महंत रामगिरी महाराजांची वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया काय?
छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “बांगलादेशात जो प्रकार घडला, आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहे. आमच्याकडे एक बातमी तर अशी आली की, बांगलादेशात एका महिलेवर तब्बल 30 जणांनी बलात्कार केला. कोटी-दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की, आम्हाला भारतात आश्रय द्या. त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देताना सांगितलं की, हिंदूंनी सुद्धा मजबूत राहायला हवं. बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे घडायला नको. अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसा सहन करणारा देखील अपराधी असतो. त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे”, असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.
“आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले आहेत. पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशावेळेला आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी, या दृष्टीकोनातून आम्ही जे काही बोललो ते बोललो आहोत. आमचा उद्देश हाच आहे, हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावं. असंघटितपणामुळे आजपर्यंत फायदा घेतला गेलाय. जे असेल ते असेल. गुन्हा दाखल झाला असेल नोटीस येईल तेव्हा बघू”, अशी प्रतिक्रिया महंत रामगिरी महाराज यांनी दिली.