कैलास बोराडे याच्या नवीन व्हिडिओने खळबळ, मंदिरात गेला अन्…सोशल मीडियावर नुसता धिंगाणा, त्या Video मध्ये काय?
Jalna Kailash Borade : जालना जिल्ह्यातील आन्वा येथील कैलास बोरडे या तरुणाला तप्त लोखंडी रॉडने अमानुष चटके देण्यात आल्याच्या व्हिडिओने समाजमन सुन्न झाले होते. त्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत होता. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

जालना जिल्ह्यातील आन्वा येथील कैलास बोराडे या तरूणाला अमानुषपणे मारहाण करण्याता आली होती. महाशिवरात्रीच्या रात्री मंदिरातच ही घटना घडली होती. जुन्या वादातून कैलास बोराडे याला तापत्या लोखंडी रॉडने अमानुष चटके देण्यात आले. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. लक्ष्मण हाके, छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी या प्रकरणी राज्याचे लक्ष वेधले होते. पण आता याप्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. या नवीन व्हिडिओने या घटनेमागील घटनाक्रम समोर आला आहे.
काय आहे हा प्रकार?
नवनाथ दौंड आणि त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत दौंड अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे पण उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते. नवनाथ दौंड याच्या सांगण्यावरून भागवत दौंड याने बोराडे याला ही अमानुष मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. बोराडे हा महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी मंदिरात गेला होता. त्यावेळी जुन्या वादातून बोराडे या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. लोखंडी रॉड तापवून त्याच्या शरीरावर चटके देण्यात आले. या अमानवीय प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पारध पोलिसांनी नवनाथ आणि भागवत दौंडविरोधात गुन्हा दाखल केला.




आता नवीन व्हिडिओत काय?
नवनाथ आणि आणि भागवत दौंड यांचे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोटो असल्याचा दावा करण्यात येत होता. तर मनोज जरांगे यांनी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी फोटो व्हायरल करण्याचा आरोप लक्ष्मण हाके यांच्यावर केला होता. तर आज सकाळी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत कैलास बोराडे याचा नवीन व्हिडिओ समोर आणला.
या व्हिडिओत बोराडे हा अर्धनग्न अवस्थेत मंदिरात आल्याचे दिसून येते. तो मद्यधुंद अवस्थेत मंदिरात आल्याचा आरोप जरांगे यांनी केला. या व्हिडिओत कैलास बोराडे असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. या व्हिडिओत हा तरुण अर्धनग्न अवस्थेत बसलेला दिसतोय. तो कुणाशी तरी वाद घालत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मंदिराच्या परिसरातच तो लोटांगण घेताना दिसतो. त्यावेळी तिथे एक तरूण बसलेला दिसतो. जवळच एक ध्वजही दिसतो. बोराडे हा मंदिराकडे लोटांगण घेत दंडवत घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दाखवला आहे. त्याची पुष्टी टीव्ही ९ मराठी करत नाही.