‘उद्या भाभीला सांगेन सत्तार भाईंना….’, कल्याण काळे यांची भाषणात तुफान फटकेबाजी
शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार कल्याण काळे यांनी उपस्थित राहून अब्दुल सत्तार यांचे कौतुक केले आणि त्यांच्या कर्तृत्वाचे वर्णन केले. काळे यांनी आपल्या भाषणात शेरो-शायरीद्वारेही सत्तार यांची प्रशंसा केली.
शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमधील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर सत्तार यांचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला. यावेळीअब्दुल सत्तार यांना शुभेच्छा देण्यासाठी जालन्याचे खासदार कल्याण काळे हे देखील उपस्थित होते. यावेळी कल्याण काळे यांनी आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. “अब्दुल सत्तार यांना माझ्या कुटुंबाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! अब्दुल सत्तार आपण खूप मेहनत घेतली. राज्याचे मंत्रिपद सत्तार यांनी कर्तृत्वाने भूषवले. सत्तार यांनी सिल्लोड किंवा संभाजीनगर पुरते काम केले नाही. तुम्ही कोणत्याही पक्षात जा, सत्तार यांचे मित्र आहेत. राजकारणा पलीकडे नाते जपण्याचे काम सत्तार करतात. कायमचे भांडण ठेऊन आपल्याला चालता येत नाही. कोणतीही निवडणूक येऊ द्या, सत्तार तयार असतात. उद्या भाभीला सांगेन सत्तार भाई यांना काळा टीका लावत जा. कारण तुम्हाला नजर लागेल असं काही जण तुमच्यावर टपलेले आहेत”, असं कल्याण काळे आपल्या भाषणात
कल्याण काळे यांची शेरो शायरी
“आपलं आरोग्य चांगलं राहावं. भविष्यात आपली चांगली प्रगती व्हावी. त्यांची एवढी प्रगती व्हावी की, त्यांनी मला सांगावं की, कल्याण काळे आता तरी लोक मला खाली बसवू शकत नाहीत. ही गोष्ट खरी आहे. कर्तृत्वान असलेल्या कार्यकर्त्यामध्ये धमक असते आणि तो माणूस कुठे जात नाही. त्यामुळे मी इतकंच म्हणेन, सत्तार भाई, नजर को नजर की नजर ना लगे, कोई अच्छा भी इस कदर ना लगे, तुझे देखा बस इस नजर से, जिस नजर से तुझे नजर ना लगे. सत्तार भाई भाभीला मी सांगेन, उद्यापासून काळा टीका लावून पाठवत जा. कारण तुमच्यावर नजर लागल्यासारखे बरेच लोक मागे लागलेले आहेत. पण यानंतर काळजी घेऊ आणि हे नेतृत्व जपायचं काम करु”, असं कल्याण काळे म्हणाले.
“जो माणूस गावचा सरपंच आणि तालुका अध्यक्ष झाला तो फक्त तिथपर्यंत न थांबता राज्याच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचला, त्याने राज्याचं मंत्रिपद कर्तृत्वाने भूषवलं. काही माणसं कर्तृत्वाने मोठी होतात तर काही नशिबाने मोठी होतात. मी नशिबाने मोठी होणारी माणसं पाहिली. पण कर्तृत्वाने मोठी होणारी माणसं ही उत्तुंग भरारी घेतात आणि राज्यभर काम करण्याची भरारी घेतात. तुम्ही फक्त सिल्लोडपर्यंत काम केलं नाही. तुम्ही फक्त संभाजीनगर जिल्हापर्यंत काम केलं नाही. तर तुम्ही राज्यासाठी काम केलं”, अशा शब्दांत खासदार कल्याण काळे यांनी अब्दुल सत्तार यांची स्तुती केली.