Maratha Reservation : मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा धडाका; आता जरांगे आणि हाके यांच्यामुळे सरकारपुढे मोठा पेच
Kunbi Caste Certificate : मराठवाड्यात मराठा-कुणबीवरुन सध्या जोरदार आंदोलन सुरु आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरु आहे. पण नवीन आंदोलनामुळे सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.
मराठा आरक्षणाचे आंदोलन गेल्या काही वर्षांपासून राज्यात घोंगावत आहे. यापूर्वी लाखोंचे मोर्चे निघाले. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्यावर्षी उपोषणाला सुरुवात केली. त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहिती आहे. आंदोलनाच्या रेट्यामुळे राज्यात अनेक भागात कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरु करण्यात आले. आवश्यक कागदपत्रांआधारे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरु आहे. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी सगे-सोयऱ्याची अंमलबजावणीसाठी सरकारला धारेवर धरले आहे. तर बोगस कुणबी नोंदी हडकून वाटलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटप करताना सरकार पेचात अडकले आहेत.
कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा धडका
मराठवाड्यात 9 महिन्यात तब्बल 1 लाख 40 हजार कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या 45 हजार 431 कुणबी नोंदी सापडल्या होत्या. 45 हजार कुणबी नोंदीच्या आधारे 1 लाख 40 हजार जणांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आकडेवारी समोर आली आहे. अजून ही प्रक्रिया सुरु आहे.
प्रतिक्षा सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीची
जर सगे सोयऱ्यांचा जीआर लागू झाला तर कोट्यवधी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. सरकारने यावर्षाच्या सुरुवातीला जरांगे पाटील यांना याविषयीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या वेशीवर मराठा आंदोलकांना शब्द दिला होता.
आंदोलनामुळे तिढा
मराठा आंदोलकांच्या मागण्या होत नसल्याने लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यावेळी सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची यशस्वी मनधरणी केली. पण त्यानंतर ओबीसी आंदोलन बचाव अंदोलन वडीगोद्री येथे सुरु झाले. मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळे सरकारपुढे आता नवा तिढा निर्माण झाला आहे. कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटपाबाबत सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.
जिल्हानिहाय कुणबी प्रमाणपत्र वाटप
1) संभाजीनगर :- 10744 2) जालना :- 10014 3) परभणी :- 9374 4) हिंगोली :- 4719 5) बीड :- 90946 (सर्वाधिक) 6)नांदेड :- 2760 7) लातूर :- 1745 (सर्वात कमी) 8 ) धाराशिव :- 9654