सरकारच्या शिष्टमंडळाला मोठं यश, मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांचं 14 व्या दिवशी उपोषण मागे
मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांनी अखेर 14 व्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांच्या उपोषणस्थळी जात त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलक राजश्री उंबरे यांनी अखेर 14 व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारकडून आज मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राजश्री उंबरे यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. अखेर यात दीपक केसरकर यांना यश आलं आहे. राजश्री उंबरे यांनी उपोषण आपलं उपोषण स्थगित केलं आहे. दीपक केसरकर आणि मंत्री अब्दुल सत्तार राजश्री यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी राजश्री यांनी 2 आठवड्यात मागण्या मान्य करण्याच्या अटीवर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मराठवाड्यातील मराठा युवकांना आरक्षणाची गरज असल्याने हैदराबाद गॅजेट लागू करुन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी राजश्री उंबरे यांची आहे.
राजश्री उंबरे काय म्हणाल्या?
“राज्य सरकारने आपल्याला दोन आठवड्यांचा अवधी दिलेला आहे. त्यांच्या या शब्दाचा मान ठेवून हे उपोषण स्थगित केलं आहे. मी मराठा बांधवांना एवढंच सांगू इच्छिते की, दोन आठवड्यात आपली मागणी मान्य झाली नाही तर दोन आठवड्यात पुन्हा आपण त्याच ताकडीने लढाई लढू”, अशी भूमिका राजश्री उंबरे यांनी उपोषण मागे घेताना मांडली.
दीपक केसरकर काय म्हणाले?
मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “गॅझेटचा मुद्दा कॉमन आहे. त्यासाठी आंदोलन सुरू आहे. दोघांशी बोलून आंदोलन विषयी बोलले जाणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील किती तालुके या खाली येतात त्यापूर्ता इंडेक्स विचार करू. कोर्टाने आरक्षणाला स्टे दिला नाही. 10 टक्के एक्सक्लुझिव्ह सुरू आहे. दोन समाजात फूट करू नये. दोघांशी बोलून विचार करू. एकी राहायला हवी”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
“विशेष अधिवेशन बोलवले आहे. आचारसंहिता लागू होणार आहे. अनुशेष भरून काढला पाहिजे. स्वतंत्र कमिटीचा विचार आहे. बहिणीची काळजी आहे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवले आहे. ते तुमच्या समाजाचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घ्या. तुमचे बहुतांश मुद्दे मान्य झाले असून उपोषण मागे घ्यावे”, अशी विनंती दीपक केसरकर यांनी यावेळी केली.