अजित पवार यांच्यासोबतच्या गुप्त बैठकीनंतर शरद पवार खरंच भाजपसोबत जाणार? बघा ते काय म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अजित पवार यांच्यासोबतच्या गुप्त बैठकीवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपसोबत जाणार का? या प्रश्नाचंदेखील उत्तर दिलं. त्यामुळे शरद पवार यांची नेमकी भूमिका काय? ते स्पष्ट झालंय.
औरंगाबाद | 16 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्या आठवड्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीमुळे शरद पवार अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. तसेच शरद पवार यांना भाजपकडून सत्तेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर आल्याच्यादेखील चर्चा सुरु झाल्या. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील याबाबत मोठा दावा केला. त्यामुळे शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. असं असताना शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर सडकून टीका केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जो सवाल उपस्थित करण्यात आला होता त्याला पवारांकडून उत्तर देण्यात आलं आहे.
“देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे तो भाजप आणि त्यांचे नेते आणि सहकारी यांची भूमिका ही समाजात विभाजन कसे होईल, कटुता कशी येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत”, असा आरोप शरद पवार यांनी केला. “ही कटुता कमी करण्यासाठी आम्ही दोन ठिकाणी बैठक घेतल्या. 31 तारखेला मुंबईत बैठक आणि 1 ला सभा घेणार आहोत. यापुढे एकत्रितपणे मोदी सरकारला पर्याय कसा देता येईल, यासाठी एकत्र आलो. समाजातील उन्माद कसा वाढेल यासाठी मोदी सरकार काम करतंय”, अशी टीका शरद पवारांनी केली.
“आपल्या देशात एक शिक्षण संस्था आहे जी केंद्राच्या सेंट्रल बोर्ड ऑफ एजयुकेशनच्या अखत्यारीत चालते. त्या विभागाने एक सर्क्युलर काढले. त्यात त्यांनी 14 ऑगस्ट हा दिवस पार्टीशन, देशातील फाळणी विसरत चाललेले असताना मोदी सरकारने एक सर्क्युलर काढला. त्या फाळणीच्या आठवणी ताज्या व्हाव्यात यासाठी प्रदर्शन भरवण्याचे आदेश काढले. या प्रदर्शनाचा कालावधी ठरवून फाळणीच्या चित्राचे प्रदर्शन भरवण्याचे सांगितले. याचा अर्थ स्पष्ट होतो की देशात कटुता वाढवणे, देशाचे ऐक्य बिघडवणे असा आमचा आरोप खरा ठरतो. याबाबत आम्ही इंडिया आघाडीत याबाबत निषेध करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
शरद पवार यांचा भाजपवर घणाघात
“भाजपकडून निवडून आलेली सरकार पाडणं हा कार्यक्रम आहे. गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र येथील सरकार पाडले गेले. असे अनेक ठिकाणी प्रस्थापित झालेली सरकार पडण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने घेतला आहे”, असा आरोप शरद पवरांनी केला.
“ईशान्य भारत हा देशाच्या भविष्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग आहे. पण अलीकडे ज्या घटना घडत आहेत त्या खूप घातक आहेत. मणिपूर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र त्याबाबत मोदींनी सभागृहाबाहेर 3 मिनीट संसदेबाहेर थांबले आणि सभागृहात 5 मिनिट बोलेल. बाकीचे पावणे दोन तास ते राजकीय बोलले. मणिपूरमध्ये स्त्रियांची धिंड काढली जाते, अत्याचार होत आहेत”, असं शरद पवार म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण केले. मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतले असावे म्हणून ते म्हणाले मी पुन्हा येईन. त्यांना नॉर्थ ईस्टमधील प्रश्न महत्त्वाचा वाटला नाही. मात्र मी पुन्हा येईन हे सांगितले. योग्य लोकशाहीच्या पद्धतीत आम्ही NDA ला धडा शिकवू”, असंही पवार म्हणाले.