मोठी बातमी ! अजितदादा मुख्यमंत्री होणार?; रावसाहेब दानवे यांनी दिली बोलता बोलता सर्वात मोठी ऑफर
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यांच्या या इच्छेला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी खतपाणी घालण्याचं काम केलं आहे. तसेच बोलता बोलता दानवे यांनी अजितदादांना मोठी ऑफरही दिली आहे.
संजय पाटील, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, जालना : मला शंभर टक्के मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यासाठी 2024ची वाट का पाहायची? असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली महत्त्वकांक्षा जाहीर केली. राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अजितदादा काहीही करू शकतात. कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय घेऊ शकतात अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या चर्चांना खतपाणी घालणारं विधान केलं आहे. अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं सांगतानाच दानवे यांनी अजितदादांना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाची मोठी ऑफरही दिली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. अजितदादांचा मुख्यमंत्रीपदासाठीच दावा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले. तेव्हा काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या होत्या. त्याहीवेळी अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. राजकारणातील या घटना आहेत. त्याच मी तुम्हाला सांगत आहे. दावा करणं वेगळी गोष्ट आहे. बहुमत असणं वेगळी गोष्ट आहे. जर बहुमताच्या बाजूने ते आले किंवा कदाचित 10-20 वर्षानं त्यांना बहुमत मिळालं तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असं सूचक विधान करतानाच रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफरच दिली. त्यामुळे तर्कवितर्क लढवल्या जात आहेत.
अजितदादांकडे लक्ष
माझा अजित पवार विरोध नाही. चांगले कार्यकर्ते आहेत. धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे काही विधान करत आहेत. त्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. दिल्लीत आणि राज्यात त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने राज्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसून आलं आहे.
चर्चांना पुन्हा उधाण
अजित पवार यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं आधी स्पष्ट केलं होतं. काल मात्र मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे. पण त्यासाठी 2024ची वाट का पाहायचीय? असं म्हणून सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.