संभाजीनगर : अब्दुल सत्तार यांचा मी राजकारणातला आजोबा आहे. मी कर्नाटकात होतो. सत्तार म्हणाले, कार्यक्रमाला यावे लागते. मी आलो. नवीन नवरी सासरी आली की स्वयंपाक कसा करायचा माहीत नसते. ती सासूला विचारते तिखट मीठ किती टाकू? आणि सासूने सुचवल्या प्रमाणे स्वयंपाक करते, अशी तुफान फटकेबाजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना रावसाहेब दानवे यांनी आपल्या खास शैलीत ही फटकेबाजी केली. तसेच कोविड येण्याच्या सहा महिने आधीच मोदींनी तयारी केली होती, असा दावाही त्यांनी केला.
सरकार शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014नंतर पीक विम्याचे नियम बदलले. त्यामुळे शेतकरी विमा भरायला लागले. शेतकऱ्यांना विमाही मिळू लागला. उद्धव ठाकरे हातवर करून शेतकऱ्यांवर बोलतात. यांना शेती माहीत आहे का? उद्धव ठाकरे यांना विचारा बटाटे जमिनी खाली येतात की वर? हरभऱ्याचे घाटे खालून येतात की वरून? असा हल्ला रावसाहेब दानवे यांनी चढवला.
शिक्षक भेटले की आमचे कुटुंब आमचे जबाबदारी. शेतकरी भेटले तरी म्हणायचे माझे कुटुंब माझी जबाबदारी. यांनी अडीच वर्षे काय केले? तर घरात बसले. मी चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस आम्ही होतो. उद्धव ठाकरे आणि अमित शाह घरात गेले. बंददाराआड चर्चा केली. दोघे अर्ध्या तासात बाहेर आले आणि मीडियासमोर युती झाल्याचं जाहीर केलं. भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्टेजवरून जाहीर केलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची दातखिळी बसली होती का? असा सवाल दानवे यांनी केला. नाव असते पण पक्ष कुणाच्या बापाचा नसतो. पक्ष कार्यकर्त्यांचा असतो, असं त्यांनी सांगितलं.
कोविड येण्याआधीच मोदींनी सहा महिने आधी तयारी केली होती. लस नव्हती ती तयार केली. जगाला पोहोचवली. देशात मोफत लस दिली, असं सांगतानाच पाकिस्तानात 250 रुपये किलो गहू पीठ आहे. भारतात मात्र मोदींनी गहू फुकट दिले देत आहेत. ट्रान्सफार्मरसाठी केंद्र सरकारने 800 कोटी दिले. आता कितीही आकडे टाका फरक पडणार नाही, असं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं.
मी खानदानी पाटील आहे. धोका देणार नाही. मोठ्यांकडून घ्याचे आणि गरिबांना द्यायचे हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा धंदा आहे. मी आणि सत्तार सर्वात जास्त गरीब आहोत. आमच्या सारखी गरिबी सगळ्यांना यावी, असं मिश्किल उद्गारही त्यांनी काढलं.