औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं, संजय राऊत यांनी भाजपला कुरुलकरांवरून घेरलं; काय म्हणाले राऊत?
शिंदे-फडणवीस हे स्वत:ला शुद्ध हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतात. मग तुमच्या सरकारमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले कसे जातात? स्टेट्स का ठेवले जातात? हे तुमच्या सरकारचं अपयश नाही का? की हे सर्व तुम्हीच घडून आणत आहात का?
औरंगाबाद : राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण तापताच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला टार्गेट केलं आहे. राऊत यांनी टॉप सायंटिस्ट डॉ. प्रदीप कुरुलकर यांचा विषय काढून भाजपला घेरलं आहे. औरंगजेबाच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहात. कुरुलकरने पाकिस्तानला भारताची गुपित विकली. हा प्रकारही औरंगजेबा इतकाच गंभीर आहे. त्यावरही आंदोलने करायला हवी होती, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. ते औरंगाबादमध्ये आले असता मीडियाशी बोलत होते.
पुण्यात डॉ. कुरुलकर ज्याने पाकिस्तानला भारताची गुपितं विकली. तो आरएसएसचा प्रमुख कार्यकर्ता होता. त्याच्या विरोधातही मोर्चा काढायला हवा होता. औरंगजेबा इतकाच हा विषय गंभीर आहे. संघाचे काही लोकं पाकिस्तानशी हातमिळवणी करतात. देशाची गुपिते विकली जातात. हनी ट्रॅपमध्ये सापडले जातात. हा विषय कोल्हापूर, नगरमध्ये औरंजेबाचा स्टेट्स ठेवण्या एवढाच गंभीर आहे. राज्यात शांतता राहावी, सर्व जाती धर्मांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. पण या सरकारच्या पायाखालची जमीन सरकत आहे. त्यामुळे ही अस्वस्थता आहे. आमची मागणी आहे गुन्हेगारांवर कठोर टीका केली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
त्यांच्या विरोधात उत्तेजन का नाही?
उद्धव ठाकरे यांची सत्ता असताना दंगली झाल्या नाहीत. त्याआधी युतीचं सरकार असतानाही दंगली झाल्या नाही. आताच का घडत आहे? गेल्या सहा महिन्यांपासून दंगली होत आहे. यामागे कुणाचं षडयंत्र आहे? कुणाला एवढीच हिंदुत्वाची ऊर्मी आली असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. पाकिस्तानला गुपितं विकणारे आमच्या संरक्षणखात्यातील लोकं पुण्यात सापडली. त्यांच्याविरोधात या संघटनांना उत्तेजन का दिलं नाही? ते का रस्त्यावर उतरले नाही?, असा सवाल राऊत यांनी केला.
त्यांच्यावर कारवाई करा
राज्यातील काही भागात दंगलसदृश्य परिस्थिती आहे. कोल्हापुरात जमावबंदी लागू आहे. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना उतरल्या आहेत. हा तणाव कोण निर्माण करत आहे. कोल्हापुरात काही तरुणांचा स्टेट्स वादग्रस्त होता. त्यातून तणाव निर्माण झाला आहे. असं चित्र निर्माण झालं. मी संभाजीनगरातून बोलतोय. याच भूमीत आम्ही औरंगजेबाला गाडलं आहे. जे औरंगजेबाचे भक्त असतील, फोटो नाचवत असतील तर त्यांना देशात राहण्याचा हक्क नाही. त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आम्ही कायम ठेवली आहे. पण फक्त हिंदुत्वासाठी तणाव निर्माण केला जात आहे. ज्यांनी स्टेट्स ठेवला असेल त्यांच्यावर कारवाई करा. ती हिंमत दाखवा, असं आव्हानच त्यांनी भाजपला दिलं.
वेगळं काही घडणार नाही
कर्नाटकात जे घडलं तेच इथे करायचं आहे. शेवटच्या दिवसापर्यंत देशाचे पंतप्रधान धर्माचं राजकारण करत होते. तणाव निर्माण करत होते. हिजाबच्या नावाने, बजरंगबलीच्या नावाने, हनुमान चालिसाच्या नावाने. पण कर्नाटकातील जनतेने हे खेळ उलटवून लावले. पराभव केला. महाराष्ट्रातही यापेक्षा वगेळं काही घडणार नाही, असा दावा त्यांनी केला.
निवडणुका होऊन जाऊ द्या
आमच्याकडून मागच्यावेळी औरंगाबादचा गड निसटला असला तरी आम्ही तो परत आणू. शिवसेनेचे आमदार पळून गेले. बेईमानी केली. तरीही शिवसैनिक आमच्या मागे आहेत. उद्या निवडणुका झाल्या तर या सर्व जागा आम्ही खेचून आणू अशी जिद्द शिवसैनिकांनी केली आहे. अर्थात निवडणुका घेण्याची हिंमत या सरकारने दाखवायला हवी. हे सरकार निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाही. मग तुम्हाला कोणत्या जनमताचा पाठिंबा आहे? तुमचं सरकार कायदेशीर आहे. गतिमान आहे. मग निवडणुका होऊन जाऊ द्या ना? जनता कुणाच्या पाठी हेही दिसेल. खरं कोण खोटं कोण होऊन जाऊ द्या, असं आव्हानच त्यांनी दिलं.