निवडणुकांसाठी औरंगजेब लागतो हेच तुमच्या कथातथित हिंदुत्वाचं दुर्देव; संजय राऊत यांचा हल्लाबोल
कोल्हापुरातील हिंसाचारवरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुमचं इंटेलिजन्स आणि गृहखातं फेल गेलं आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
औरंगाबाद : कोल्हापूर येथील दंगलीवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमचं सरकार घटनाबाह्य असलं तरी तुम्ही सत्तेत आहात. त्यामुळे राज्यातील जनतेच्या मालमत्तेचं, जनतेच्या जिवीताचं संरक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण तुम्ही दंगली घडवत आहात. कारण भविष्यातील निवडणुकांवर तुमचा डोळा आहे. तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी औरंजेब लागतो हे तुमच्या तथाकथित हिंदुत्वाचं दुर्देव आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. तुमचं इंटेलिजन्स फेल आहे. तुमचं गृहखातं फेल आहे. आम्ही पत्रकार आहोत. आम्ही राजकारणात आहोत. आम्ही महाराष्ट्रावर राज्य केलं आहे. आम्हालाही राज्याच्या कानाकोपऱ्यात काय चाललं याची माहिती आहे. उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही काय सांगतो ते तुम्ही करत नाही. तुम्ही फक्त कायदा आणि पोलीस यंत्रणा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी वापरत आहात. गुंडाच्या मुसक्या आवळत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही पोलिसांचा वापर करत आहात, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
तीन महिन्यात सरकार जाणार
तुमचे आणि आमचे काही मतभेद असू शकतात. आपले राजकीय मार्ग वेगळे झालेले असू शकतात. पण तुमच्या कार्यक्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास असताना महाराष्ट्र रसातळाला जात आहे. हे सरकार आहे. हे सरकार घटनाबाह्य असलं, सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार असली तरी हे सरकार सत्तेत आहे. पुढल्या तीन महिन्यात हे सरकार शंभर टक्के जाणार हे मी तुम्हाला आज सांगतो. तरीही तुम्ही सत्तते तुम्ही बसला आहात, अशी टीका राऊत यांनी केली.
गृहमंत्र्यांमध्ये हिंमत आहे काय?
शिवसेना पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात अशा धमक्या ऑन एअर कोणी दिल्या नव्हत्या. फडणवीस म्हणतात ना औरंग्यांना सोडणार नाही. ते औरंगे तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत. मोगलाई दुसरी काय होती हीच ना. मोगलाई म्हणजे खान, सलीम नाही. तर मोगलाई म्हणजे प्रवृत्ती आहे. हिंमत असेल तर करा या लोकांवर कारवाई. ज्यांनी ऑन एअर धमक्या दिल्या त्यांच्यावर कारवाई करण्याची गृहमंत्र्यांमध्ये हिंमत आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
स्वत:ला विचारा गृहमंत्री आहे का?
पोलीस आयुक्तांना फोन करून धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची तुमच्यात हिंमत आहे काय? तरच फडणवीस यांनी सांगावं या राज्याचा मी गृहमंत्री आहे म्हणून.विरोधकांच्या बाबतीत आधी फाशी मग चौकशी. देशभरात आणि राज्यात हाच प्रकार सुरू आहे. स्वत: बाबतीत चौकशी नाही, एफआयआर नाही, तक्रार नाही, गुंडापुंडाचं खुलं समर्थन ही या राज्याची परिस्थिती आहे. म्हणून फडणवीस यांनी स्वत:ला विचारावं मी या राज्याचा गृहमंत्री आहे का? असा सवाल त्यांनी केला.