मंत्री बनताच संजय शिरसाट अॅक्शन मोडवर, ‘या’ लोकांवर कारवाई करणार
"कुणीही पालकमंत्री असो, आमदार असो की खासदार असो, शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणार. जर असमान निधीचा वाटप झाला असेल तर कारवाई होणार", असा मोठा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची वर्णी लागली आहे. संजय शिरसाट हे गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदासाठी आग्रही होते. पण त्यांना मंत्रिपदाची संधी गेल्या अडीच वर्षात मिळाली नाही. पण आता राज्यात महायुतीला प्रचंड बहुमतांनी विजय मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तसेच खातेवाटपात देखील संजय शिरसाट यांना चांगलं खातं मिळालं आहे. यानंतर आता संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय शिरसाट मंत्री झाल्यानंतर आता काय-काय कामे करणार? याबाबत त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर नवी जबाबदारी टाकली आहे. मला सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी दिली आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. “जमीन बळकविण्याच्या कामांना थांबविण्याकडे माझं लक्ष असणार आहे. कोणत्याही पक्षाचा असो, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दुसऱ्याची जमीन बळकावणं गुन्हाच आहे. सिल्लोड असो की छत्रपती संभाजीनगर जिल्हा जमीन बळकवणाऱ्यांचा बंदोबस्त होईल”, असा मोठा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.
‘एकनाथ शिंदे दर 3 महिन्यांनी मंत्र्यांचा आढावा घेणार’
यावेळी संजय शिरसाट यांनी शिवसेनेतील आतली बातमी सांगितली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकांना मंत्रिपदाची संधी दिली असली तरी ते परफॉर्मन्स पाहणार आहेत. एकनाथ शिंदे दर 3 महिन्यांनी मंत्र्यांचा आढावा घेणार आहेत. जो शिवसेनेचा मंत्री काम करणार नाही, त्याचं खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संजय शिरसाट यांचा अब्दुल सत्तार यांना इशारा?
“कुणीही पालकमंत्री असो, आमदार असो की खासदार असो, शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणार. जर असमान निधीचा वाटप झाला असेल तर कारवाई होणार. डीपीडीसीचा अहवाल मागितला आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. संजय शिरसाट यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना टोला लगावला तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्त संजय शिरसाट यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. “ते मोठे नेते आहेत, ते शहरात काय मुंबईतही वाढदिवस साजरा करू शकतात. त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा”, असं संजय शिरसाट म्हणाले. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मी पुन्हा येईन, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “अडीच वर्षानंतर ते बोलले मी परत येणार, त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील”, असं संजय शिरसाट म्हणाले.
यावेळी संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे यांनी टाळी देण्याच्या प्रयत्न केला. पण उद्धव ठाकरे यांनी हात मागे घेतला”, असं संजय शिरसाट म्हणाले.