औरंगाबादमध्ये औरंगजेबाचे फोटो दाखवले, शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मग पुण्यात दंगल…
भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून शरद पवार यांचा वारंवार एकेरी उल्लेख केला जातो. त्याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. कशाला त्यांना एवढं महत्त्व देता, असं पवार म्हणाले.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये संदलच्या मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन एक व्यक्ती नाचत असल्याचं समोर आल्यानंतर त्याच्या राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, पोलिसांच्या सावधानतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु, या प्रकारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच आंदोलन करणाऱ्यांचे कडक शब्दात कान उपटले आहेत. औरंगाबादमध्ये औरंगजेबाचे फोटो दाखवल्यानंतर पुण्यात दंगल करण्याचं कारण काय? असा सवाल करतानाच फोटो दाखवला तर काय परिणाम होतो? अशा शब्दात शरद पवार यांनी कान टोचले आहेत. शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मर्यादित भागात तणाव झाला असेल तर चांगली गोष्ट आहे. मी ते म्हणत नाही. पण हे घडत नाही. औरंगाबादेत औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचं काय कारण आहे? त्यासाठी पुण्यात आंदोलन करण्याचं कारण काय आहे? फोटो दाखवला त्यातून काय परिणाम होतो? कुणाला पडलंय त्याचं?, असा सवाल शरद पवार यांनी केला.
राज्यकर्त्यांचं कर्तव्य काय?
नगरला काही तरी झालं. कोल्हापूरला काही झालं. कुणी तरी मोबाईलवर मेसेज पाठवला. चुकीचा असेल, नाही असे नाही. पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही. सत्ताधारी वर्ग अशा गोष्टीला प्रोत्साहित करतो. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पण राज्यकर्तेच रस्त्यावर उतरायला लागले, त्यांचे सहकारी उतरायला लागले तर दोन समाजात जातीय कटुता निर्माण होत आहे. ते योग्य नाही, असं पवार म्हणाले.
त्यामागे विचारधारा
ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले झाले. चर्च आणि ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय असतो. काही तक्रार असेल तर पोलिसांना सांगितली पाहिजे. पण म्हणून चर्चेवर हल्ला करण्याची गरज काय आहे? या मागे एक विचारधारा आहे. ती विचारधारा सामाजाच्या हिताची नाही, असा आरोप त्यांनी केला.
कुस्तीगिरांना पाठिंबा
कुस्तीगिरांच्या आंदोलनावरही त्यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही लोकांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. अनेकांनी पाठिंबा दिला आहे. बृजभूषण सिंह शरण हे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्याविरोधात सरकार किती खोलात आहे हे पाहावं लागेल. त्यांची चौकशी सुरू झाली आहे. मात्र, कुस्तीगिरांचं म्हणणं आहे की त्यांना अटक करा. पण निदान चौकशी सुरू केली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.