Sambhaji Raje : संभाजीराजे नवा पक्ष काढणार? माजी खासदार, आमदार संभाजीराजेंच्या संपर्कात, पुण्यातल्या घोषणेकडे लक्ष
मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी संभाजीराजे उपोषणाला बसलेले दिसून आले. त्यावेळच्या संभाजीराजेंच्या मागण्या तर राज्य सरकारने मान्य केल्या मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे आता खासदार संभाजीराजे नवा पक्ष काढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई : राज्यात सध्या हिंदूत्व, हनुमान चालीसा, अयोध्या दौरे, ओबीसी आरक्षण, नवनीत राणा जेलवारी अशी विविध प्रकरण गाजत आहेत. मात्र राज्याचे राजकारण काही दिवसात वेगळे वळण घेणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गेल्या काही काळापाासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तसाच प्रलंबित आहे. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढाही अजून सुटलेला नाही. राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतानाच्या काळात मराठा आरक्षण दिलं. मात्र अलिकडच्या काळात सुप्रिम कोर्टात ते टिकलं नाही. सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षण तसेच ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करत राज्य सरकारला मोठा दणका दिला. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचेही पहायला मिळाले. संभाजीराजे (Sambhajiraje) यांनीही मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरत राज्यभर मेळावे घेतले. त्यानंतर मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी संभाजीराजे उपोषणाला बसलेले दिसून आले. त्यावेळच्या संभाजीराजेंच्या मागण्या तर राज्य सरकारने मान्य केल्या मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे आता खासदार संभाजीराजे नवा पक्ष काढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
समर्थकांनी बनवलेलं पोस्टर
नव्या पक्षाची घोषणा करणार?
आता संभाजीराजे समर्थकाकडून चलो पुणे चा नारा देण्यात आलाय. आता “महाराष्ट्राच्या भल्यासाठी नवी दिशा, नवा विचार, नवा पर्याय” आशा टॅगलाईन खाली पुण्यातील 12 तारखेच्या कार्यक्रमाला येण्याचं केलं आवाहन जातंय. खासदार छत्रपती संभाजीराजे 12 तारखेनंतर राज्याचा दौरा करण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील माजी आमदार खासदारांकडून छत्रपती संभाजीराजेंना संपर्क करायला सुरुवात झाली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
उद्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार
उद्या छत्रपती संभाजीराजे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार अशीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर राज्याचा दौरा करून राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फक्त राजकीय पक्षच नाही तर सामाजिक संघटनांकडून संभाजीराजेंना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आणि याबाबत 12 तारखेला पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे भूमिका मांडणार अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
संभाजीराजे यांच्याबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. मी देखील राज्यसभेत त्यांचा सहकारी आहे. ज्यावेळी महाराष्ट्राचे काही प्रश्न राज्यसभेत येतात तेव्हा महाराष्ट्रातील सदस्यांना बोलावून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येण्याची भूमिका आम्ही घेतो. अशा कामांमध्ये संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे. पण त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ असेही शरद पवार यांनी सांगितले.