Waghya Dog Controversy : ‘शिवाजी महाराजांना अग्नि दिला, त्यावेळी त्यात…’ संभाजीराजे वाघ्या कुत्र्याबाबत काय म्हणाले?
"आता दुर्देवाने इंदूरच्या तुकोजीराव होळकर महाराजांच नाव तिथे घेतलं जातं. त्यांनी या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली. मला स्पष्टपणे सांगायच आहे, होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आयुष्य दिलं. अशावेळी एका कुत्र्याच्या स्मारकासाठी तुकजोरीराव कशी मदत करतील? उलट तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करताय" असं संभाजीराजे म्हणाले.

“वाघ्या कुत्र्याच स्मारक तिथून हटवावं अशी मुख्यमंत्र्यांना विनंती करणारं पत्र मी लिहिलं होतं. आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची मी भेट घेतली. त्यांना, सविस्तरपणे जो काही इतिहास आहे, शिवभक्तांनी माहिती अधिकारात जी माहिती मिळवलीय ती त्यांच्यासमोर मांडली. पुरातत्व खात्याने त्यात स्पष्टपणे नमूद केलय, वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारक म्हणून कुठेही नोंद नाही. या वाघ्या कु्त्र्याच स्मारक 1936 ला पू्र्ण झालं. 2036 पर्यंत हे स्मारक हटवलं नाही, तर प्रोटेक्टेड मॉन्यूमेंट म्हणून त्याची नोंद होईल. म्हणून हा विषय मी घेतलेला आहे. आधी शिवभक्तांनी प्रयत्न केला, त्यांना न्याय मिळाला नाही, म्हणून मी ही लाईन घेतली” असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
“शिवाजी महाराजांना अग्नि दिला, त्यावेळी त्यात वाघ्या कुत्र्याने उडी मारल्याचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाहीय” असं संभाजीराजे म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना काही फोटो दाखवले. महाराष्ट्रातल्या एकाही इतिहासकाराने मग ते डाव्या, उजव्या किंवा सेंटर विचारसरणीचा असो, वाघ्या कुत्र्याचे पुरावे असल्याच म्हटलेलं नाही. मग प्रश्न निर्माण होतो की, शिवाजी महाराजांच्यावेळी कुत्रे होते का?. मी नाकारात नाही, कुत्रे असू शकतात” असं संभाजी राजे म्हणाले.
‘वाघ्या कुत्र्याच्या स्मारक हे शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच’
“राजसन्यास नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. त्या दंतकथेतून हा वाघ्या कुत्रा प्रगट झाला. त्याचं स्मारक बांधलं. पण वाघ्या कुत्र्याचा एकही पुरावा मिळणार नाही. सर्व इतिहासकारांना सरकारने बोलवावं, मला बोलवा, जे विरोध करतायत त्यांना बोलवा. समोरासमोर बसून आपण बोलू. कुठे पुरावे आहेत? वाघ्या कुत्र्याच्या स्मारक हे शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे. हे कुठल्या शिवभक्ताला आवडेल?” असा सवाल संभाजीराजेंनी विचारला.
इथे जातीचा विषय येतो कुठे?
“धनगर समाज हा इतका विश्वासू आहे की, मला आयुष्यभर ज्यांनी संभाळलं, जेवण दिलं, राजवाड्यातील कुक धनगर समाजाचा आहे. माझा सेवक, माझा चालक तो इतका विश्वासू आहे की, तो सुद्धा धनगर समाजाचा आहे. माझा अंगरक्षक धनगर समजाचा आहे. इथे जातीचा विषय येतो कुठे? वाघ्या कुत्र्याच आपण स्थलांतर करु शकतो. रायगड किल्ल्याच्या खाली चांगला प्रोजेक्ट होईल, तिथे स्थलांतर करु शकतो” असं संभाजीराजे म्हणाले.