Sangli Flood : कृष्णा, वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ, सांगलीत मदतकार्यासाठी लष्कर पाचारण
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळी वाढल्याने जिल्ह्यातील 25 रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे. तर वाळवा तालुक्यातील शिरगावला पुराचा वेढा पडलाय.
सांगली : कृष्णा आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. तर शहरातील पूर पट्ट्यातील सखल भागातल्या 200 पेक्षा अधिक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त कुटुंबांचे आणि 350 पेक्षा अधिक जनावरांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळी वाढल्याने जिल्ह्यातील 25 रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे. तर वाळवा तालुक्यातील शिरगावला पुराचा वेढा पडलाय. त्यामुळे शेकडो लोक अडकून आहेत. त्याठिकाणी एनडीआरएफच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. (Increase in water level of Krishna and Warna rivers)
सांगलीतील परिस्थिती गंभीर बनत असल्याने मदतकार्यासाठी आर्मीला देखील जिल्हा प्रशासनाकडून पाचारण करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत सैन्य दलाच्या दोन तुकडया जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिरगावला चारही बाजूने पाण्याचा वेढा
सांगलीतील शिरगावला चारही बाजूने पाण्याने वेढल्याने नागरिक अडकले आहेत. मात्र, शिरगावातून 200 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. संध्याकाळपर्यंत अजून 1 हजार 200 जणांना बाहेर काढलं जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. ते पिंपरीमध्ये बोलत होते. ज्या भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे, त्या भागात मुख्यमंत्र्यांसह मंत्री जातील, पण आज लोकांना वाचवणं महत्वाचे आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कंट्रोल रूममध्ये बसून मदतीचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करत आहेत. आपणही सांगलीत पोहोचत आहोत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
सर्व ठिकाणी सर्वतोपरी मदत – पाटील
कालपासून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे. फक्त शिरगावला चहुबाजूंनी पाण्याने वेढलं आहे. तिथून देखील 200 नागरिकांना बाहेर काढलं आहे. आताही तिथं बचावकार्य सुरु आहे. संध्याकाळपर्यंत इथले लोक सुखरूप बाहेर येतील. त्यामुळे सर्व ठिकाणी सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे. त्यामुळे सरकारचे कोणतेही दुर्लक्ष नाही, असा दावा पाटील यांनी केलाय.
संबंधित बातम्या :
Increase in water level of Krishna and Warna rivers