मोठी घडामोड ! काकाच्या पक्षाला पुतण्याचं खिंडार, चार माजी आमदार अजितदादांच्या गटात प्रवेश करणार; सांगलीत मोठी राजकीय उलथापालथ
सांगलीत अजित पवार गटाचा भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का. चार माजी आमदारासह, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. सांगलीत मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे.

सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. कारण माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील या पाचही नेत्यांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत महाराष्ट् क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दुपारी 4 वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे. सांगली जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पक्षप्रवेश पार पडेल. हे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांच्या पक्षप्रवेशानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
अनेक दिवसांपासून बैठका सुरू
शिवाजीराव नाईक व राजेंद्रअण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विलासराव जगताप हे भारतीय जनता पक्षामधून बाहेर पडले आहेत. अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते. या चारही नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू आहेत. राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या चार बैठका झाल्या. अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाचा निर्णय घेतला.
तर रवी तमन घोडा पाटील हे भाजपचे नेते असून ते जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती होते. जतमधून त्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर ते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढले व त्यांचा पराभव झाला. आज तेही राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. आज २२ एप्रिल रोजी मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. पाचही नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे.
राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता. काही महिन्यानंतर महापालिकेच्या काही माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून अजित पवार गटाला ताकद मिळाली. आता चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाला आणखी बळ मिळाल्याचे चित्र आहे. या जाहीर प्रवेशामुळे सांगलीतील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.