‘मी नापास नाही’, अखेर संजय राठोड यांनी मौन सोडलं, मनातलं सर्व बोलले
मंत्री संजय राठोड यांनी आपल्या कामगिरीबाबतच्या "नापास" अहवालाच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी दुष्काळ निवारणाच्या योजनांबद्दल माहिती दिली, ज्यात पानलोट क्षेत्रासाठी रथयात्रा आणि तलावांचे दुरुस्तीचे काम समाविष्ट आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी मंत्री संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल अशी चर्चा होती. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना संजय राठोड यांच्या कामांचं पाठवलेल्या प्रगती पुस्तकात ते नापास असल्याचं म्हटल्याचीदेखील चर्चा होती. त्यामुळे राठोड यांचं मंत्रिपद कापलं जाईल, अशी चर्चा होती. पण संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. या सर्व घडामोडींनंतर संजय राठोड यांना आपण मंत्र्यांच्या कामांच्या प्रगती पुस्तकात नापास होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राठोड यांनी आज अखेर स्पष्टपणे भूमिका मांडली. “मी नापास नाही आणि प्रगती पुस्तक ही चुकीची बातमी दाखवली गेली”, असं संजय राठोड म्हणाले.
“या बातम्या कोण देतं, कशा येतात, मला माहित नाही. सगळे जण चांगलं काम कसं होईल, असा सगळ्यांचा उद्देश आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत आहे. पण विरोधकांमध्ये काय सुरु आहे हे आपण बघतोय की त्यांच्यात एकी नाही. त्यांनी प्रभावीपणे अधिवेशनात मुद्दे मांडले नाहीत”, अशी टीका संजय राठोड यांनी केली. तसेच “पानलोट क्षेत्रासाठी जानेवारी महिन्यापासून रथयात्रा काढू आणि चार महिने ही रथयात्रा असेल. ३० जिल्ह्यात ही रथयात्रा जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
मंत्रालयातील बैठकीत काय निर्णय घेतला?
“निवडणुका झाल्या आणि प्रचंड मतांचा आशीर्वाद महायुतीला मिळाला. परत मला जबाबदारी दिली आहे. आज मी चार्ज घेतला आहे. मृदा आणि जलसंधारण विभागात जोमाने काम करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दुष्काळमुक्त महाराष्ट्रसाठी काय काय करावं लागेल? त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करयाला सांगितले आहे. पानलोटसाठी रथयात्रा काढणार आहोत. 2 हजार गावात ही यात्रा असेल. देशाचे कृषीमंत्री, राज्याचे ममुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सहभाग घेतला. इतर संस्थेला मी बोलवलं होते. पानलोट क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांना बोलवलं होते. जलयुक्त शिवार कार्यक्रम 2 योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे”, असं संजय राठोड म्हणाले.
“गाळ काढण्याचे काम देखील आम्ही करणार आहोत. विदर्भात १ हजाराच्यावर तलाव आहेत. ब्रिटिश कालीन ते आहेत. त्यांची दुरुस्तीचे काम आम्ही करणार आहोत. जे काही बंधारे आम्ही करणार आहोत ते ब्रिज कम बंधारे करणार आहोत. सर्व अॅकशन प्लॅन मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सादर करणार आहे”, अशी माहिती संजय राठोड यांनी दिली.
“मी आधी जिकडे राहत होतो तेच मला मिळाले आहे. खात्याच्या संदर्भात मी समाधानी आहे. बंगले वाटपासंदर्भात कोणतीही नाराजी नाही. सर्व विभागात आम्ही चांगले काम करुन दाखवणार आहोत. कोणाला कोणतं खातं मिळालं यापेक्षा सगळे काम करुन दाखवणार आहोत”, असं संजय राठोड म्हणाले.