भाजप चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचाही पक्ष फोडेल; संजय राऊत यांचं भाकीत
संजय राऊत यांनी भाजपवर पक्षफोडीचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटांना भाजप फोडेल असे भाकीत केले आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षांवरही धोका असल्याचे राऊत म्हणाले.

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे. भाजपला पक्ष फोडण्याची सवयच आहे. भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गटही फोडेल. एवढेच नव्हे तर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचाही पक्ष भाजप फोडेल, असं भाकीत संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. संजय राऊत यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यानी हा दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटात नवा उदय होणार आहे. मला कुणाची नावं घ्यायची नाही. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच पद्धतीने अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भाजपाला ही पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. फक्त इथे नाही. देशभरात हाच प्रकार चालू आहे. चंद्राबाबूंचा पक्षही तोडला जाईल. नितीश कुमार यांचा पक्षही तोडला जाईल. यांच्या दाताला, जिभेला रक्त लागलं आहे. ही चटक आहे, तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण सुरू राहील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
त्यांच्याशी हातमिळवणी करायला सांगता?
भाजपसोबत शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावरही राऊत यांनी उत्तर दिलं. हा जुना प्रश्न आहे. त्यात काही तथ्य नाही. अमित शाह आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्राची लूट करून गुजरातला जात आहेत. त्यांच्याशी हातमिळवणी करायला सांगता? ते मराठी माणसाच्या रक्तात नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
विधानसभेत काय चर्चा झाली?
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यात फडणवीस यांचं सरकार आहे. विधानसभेच्या आधी यांच्यात काय चर्चा झाली हे महाराष्ट्राला माहीत नाही. जरांगे लढवय्ये नेते आहेत. ते सामाजासाठी लढत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. यापेक्षा आम्ही काहीच बोलू शकत नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं.
बेरोजगारांची श्वेतपत्रिका काढा
पुण्यात नोकरभरतीवेळी प्रचंड गर्दी झाली होती. त्यावरूनही राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला. हिंजवडी किंवा पुण्यातील भाग आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहे. आयटी क्षेत्रात आपण प्रगती केली असं सांगितलं जातं. पण राज्यासह देशातील बेरोजगारी कशी रस्त्यावर आहे हे काल दिसलं. काही मोजक्या जागांसाठी आयटी क्षेत्रातील 5 हजारापेक्षा अधिक इंजीनिअर रस्त्यावर होते. म्हणजे आयटी क्षेत्रातील हजारो तरुण बेरोजगार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दावोसमधून परकीय गुंतवणूक आणतात. रोजगार वाढवण्यासाठी, उद्योग वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. खरंतर राज्यातील बेरोजगारीची श्वेतपत्रिका काढा. हिंजवडीत सहा हजार आयटी क्षेत्रातील पदवीधर रस्त्यावर होते. मोदी म्हणतात यांनी पकडो तळावे. तुम्ही या इंजीनिअरला पकोडे तळायला लावणार का फडणवीस? हे राज्यातील चित्र आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.