ज्यांना देशच तोडायचा आहे, त्यांनी दर्गे तोडले तर आश्चर्य काय ? राऊतांची घणाघाती टीका
नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला सुरुवात झाली. हे म्हणजे शिवसेनेच्या शिबिरावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. सत्तेतील लोकांनी घाबरून हे केल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. शिबीराच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना राऊत यांनी पक्ष बांधणी आणि जनतेचा सहभाग यावर भर दिला.

आज उबाठा गटाचे नाशिकमध्ये निर्धार शिबीर असून आजच नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला सुरुवात झाली. आपलं म्हणणं मांडण्यासाठी दर्गा ट्रस्टला दिलेली मुदत आज संपली. त्यामुळे दर्ग्याच्या उर्वरित बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली. मात्र उबाठाच्या शिबीरात अडथळे आणण्यासाठीच हे काम सुरू असल्याचा आरोप शिवेसना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ज्यांच्या हातात सत्ता आहे, तेच आम्हाला घाबरतात, अजूनही शिवसेनेची दहशत, भीती आहे. नाशिकमध्ये दर्गे हटाव मोहीम सुरू केली आहे, बुलडोझर फिरवणार, त्यासाठी आजचाच दिवस का निवडला ? गोंधळ निर्माण व्हावा, शिवसेनेच्या शिबीरावरचं लक्ष दुसरीकडे जावं, म्हणून दर्ग्यावरती बुलडोझर टाकत आहेत, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे, असं आव्हानही राऊत यांनी दिलं.
नाशिकमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निर्धार शिबिर आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत हे शिबीर होणार असून त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तुम्ही जळू आहात, राऊतांचे टीकास्त्र
तुम्हाला वातावरण नासवायचं आहे, वातावरण खराब करायचं आहे. पण ज्यांना देशच तोडायचा आहे, त्यांनी दर्गे तोडले तर त्यात आश्चर्य़ वाटण्यासारखं काहीच नाही, अशी घणाघाती टीकाही राऊतांनी केली. कारवाईआहे नंतरही करता आली असती, पण आजचाच दिवस निवडला. आज येथे उद्धव ठाकरे येणार आहेत, आदित्य ठाकरे पोहोचले आहेत, महत्वाचे नेते येणार आहेत. शिवसेनेचं महत्वाचं शिबीर आणि अधिवेशन आज पार पडणारा आहे. म्हणून त्यांनी आजचा दिवस निवडला , म्हणजे ते जळता, जळू आहात तुम्ही, डरपोक आहात अशा शब्दांत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची, शिवसेनेच्या सावलीती भीती वाटते,म्हणून तुम्ही असे फालतू उद्योग, नसती उठाठेव करता असा आरोपही राऊत यांनी केला. पण या कारवाईमुळे शिबीरावरती काहीच परिणाम होणार नाही, ते जोरात होईल, असं राऊतांनी ठासून सांगितलं.
सत्ता हा आमचा ऑक्सीजन नव्हे
आम्ही सगळे लढणारे लोक आहोत, वर्षानुवर्ष आम्ही संघर्ष करतोय, सत्ता हा काही आमचा ऑक्सीजन नाही. पण सत्तेसाठी सोडून गेलेल्यांना आम्ही हुजरेगिरी करताना पाहतोय. या राज्याची जनताही अस्वस्थ आहे, ज्याप्रकारे सत्ता परिवर्तन झालंय ,त्याच्याशी जनता सहमत नाही, आम्हाला आमच्यासोबत जनतेला घ्यायचं आहे. निवडणुकांसाठी हे अधिवेशन नाही, पक्ष बांधणी, संघटना बांधणी आणि जनतेला सोबत घेऊन काम करणं हा आमचा मूळ उद्देश आहे, असं संजय राऊत म्हणाले.