कुभांड रचण्याची ट्रेनिंग महाराष्ट्र पोलिसांना सीबीआयकडून घ्यावी लागेल, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
कुभांड रचण्याची ट्रेनिंग महाराष्ट्र पोलिसांना आता सीबीआयकडून घ्यावी लागेल कारण खोटे पुरावे कसे दाखवायचे, खोटे साक्षीदार कसे उभे करायचे, हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
मुंबईः कुभांड रचण्याची ट्रेनिंग महाराष्ट्र पोलिसांना आता सीबीआयकडून घ्यावी लागेल कारण खोटे पुरावे कसे दाखवायचे, खोटे साक्षीदार कसे उभे करायचे, हे केंद्रीय तपास यंत्रणांचं काम आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारवर गंभीर आरोप केले. भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीने कुभांड रचले असून या सगळा प्लॅन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयात शिजल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच हे आरोप सिद्ध करणारा 125 तासांचा व्हिडिओदेखील फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. यामुळे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहे.
कुभांड रचण्यासाठी ईडी, सीबीआयकडे जावं लागेल- राऊत
फडणवीसांच्या व्हिडिओ बॉम्बवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘ विरोधी पक्षनेते यांचं हे कामच असतं आरोप करण्याचं. त्यांनी ते केले. पण महाराष्ट्र पोलिसांवरचे आरोप खोटे आहेत. महाराष्ट्राचे पोलीस असे कधीच करत नाहीत. महाराष्ट्राच्या पोलिसांना एक चांगलं प्रशिक्षण आहे. राज्याच्या पोलिसांना यासाठी प्रतिष्ठा आहे की ते खोट्या दबावाखाली कारवाया करत नाहीत. आणि कुंभांड करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला त्यांना ई डी आणि सीबीआयकडे पाठवावा लागेल प्रशिक्षण घेण्यासाठी. खोटे पुरावे खोटे साक्षीदार कसे उभे करायचे हेच सध्याच्या केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
कालच्या नाट्याचं स्क्रिप्ट कुणाचं?
देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या आरोपांमागे नेमकं कोण आहे, हे शोधून काढलं जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. ते म्हणाले, ‘ हे स्क्रिप्ट कोणी लिहिलेलं आहे, भाजपाचे सलीम-जावेद कोण आहेत? त्यातली पात्र कोण आहेत? नेपथ्य कोणाचं आहे? दिग्दर्शन कोणाचं आहे? त्याच्या खोलाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेन ड्राइव्ह घेऊन समोर येईल, अशा इशारा संजय राऊत यांनी दिला.
ती तेवढ्यापुरती सळसळ…
संजय राऊत पुढे म्हणाले, ‘ पुरावे सादर करायला अभ्यास किंवा संयम लागत नाही. ती तेवढ्यापुरती सळसळ असते आणि खळबळ असते खळबळ माजवणं हाच जर हेतू असेल विरोधी पक्षाचा, तर ती खळबळ देखील माजलेली नाही. काल मी जी ई डी वरती पुराव्यासह काही आरोप केले आहेत ते खळबळजनक आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई आणि महाराष्ट्रात काय काम करत आहेत त्यांच्या खंडणीखोरीची प्रकरणे समोर आलेली आहेत, त्यावर फडणवीस का बोलत नाहीत? राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाईंचा अपमान केला, त्यावर काही भूमिका घेतली असती तर त्यांच्या कालच्या पेन ड्राईव्हला काही महत्त्व आलं असतं. तुम्ही एकतर्फी काम करत आहात, विरोधी पक्षनेता हा राज्याच्या जनतेची भूमिका मांडत असतो, हे विरोधी पक्षनेते विसरलेले दिसत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
इतर बातम्या-