आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, Kashmir Files वरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
संजय राऊत म्हणाले की, मी कोणाची वकिली केली नाही. आम्ही अनेक वेळा अमन आणि शांतीसाठी काश्मीरमध्ये गेलो. आम्ही टुरिस्ट म्हणून गेलो नाही. खरे तर बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरसाठी जे केले ते कोणीच केले नाही.
मुंबईः द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या बहुचर्चित चित्रपटावरून सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. हा चित्रपट टॅक्स-फ्री करा म्हणणारे भाजप (bjp) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करावा, अशी मागणी भाजप आमदारांनी विधिमंडळात लावून धरली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनीही विधानसभेत भाजपची कोंडी केली होती. त्यांनी मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून दिली. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमाचा उल्लेख केला. केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला, तर संपूर्ण देशालाच लागू होईल. अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर संजय राऊत यांनीही काश्मीर फाइलवरून भाजपला घेरले आहे.
आता काश्मीर आठवले…
संजय राऊत म्हणाले की, आता त्यांना काश्मीर आठवले आहे. मोदी म्हणाल्यानुसार आम्ही पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात येतोय, त्याची वाट पहात आहोत. काश्मीरी पंडितांना शस्त्र द्या, असे बाळासाहेब परखडपणे म्हणाले होते. मात्र, आम्ही कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही. सध्या लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. विरोधकांनी त्या चित्रपटावरून राजकारण करू नये. आम्ही ठाकरे चित्रपट बनवला. मात्र, तो सुद्धा टॅक्स फ्री केला नाही.
आपल्याकडे सगळी माहिती…
संजय राऊत म्हणाले की, काश्मीर प्रकरणावर आम्ही कधी राजकारण केले नाही. दहशतवादी अमरनाथ यात्रेत धमकी देत होते. तेव्हा केंद्र सरकार कुठे होते. बाळासाहेब पहिले नेते होते, त्यांनी असा इशारा दिला की, तेव्हा कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर तुमचे विमान साधे हजपर्यंत उडणार नाही, अशी धमकी दिली. द काश्मीर फाइल्स चित्रपट कसा बनला, याबाबत मला सगळी माहिती आहे.
शांतीसाठी काश्मीरमध्ये गेलो…
संजय राऊत म्हणाले की, मी कोणाची वकिली केली नाही. आम्ही अनेक वेळा अमन आणि शांतीसाठी काश्मीरमध्ये गेलो. आम्ही टुरिस्ट म्हणून गेलो नाही. खरे तर बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरसाठी जे केले ते कोणीच केले नाही. मोदी पाक व्याप्त काश्मीर करू म्हणाले होते. ते पाहावे. 2014 मध्ये घर वापसीची घोषणा दिली होती. तेव्हा आम्ही समर्थन दिले. 340 बाबत देखील समर्थन दिले, याची आठवणही त्यांनी करून दिली.
इतर बातम्याः